घरमहाराष्ट्रआजच्या समाजाची अवस्था रामायणातील बेडकासारखी..., संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा

आजच्या समाजाची अवस्था रामायणातील बेडकासारखी…, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा

Subscribe

मुंबई : देशात आणि जगात आता श्रेष्ठ पुरुष जन्मास येणे बंद झाले आहे. जगभरातील व्यक्तिपूजक आणि अंधभक्त ज्यांना श्रेष्ठ पुरुष समजतात ते शेंदूर फासलेले दगड आहेत. ‘इसापनीती’मधील निळ्या कोल्ह्याच्या गोष्टीप्रमाणे काही लोकांना नशिबाने, वशिल्याने आणि प्रजेच्या मूर्खपणामुळे ते छोटे असूनही मोठ्या खुर्चीवर बसण्याचे भाग्य लाभले, अशी जोरदार टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा – भाजपच्या प्रचाराला जाण्यापेक्षा महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या, संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

- Advertisement -

आजच्या समाजाची अवस्था रामायणातील बेडकासारखी झाली आहे. वनात वास्तव्य करीत असताना प्रभू रामचंद्र एकदा पंपा सरोवरात पाणी पिण्यासाठी गेले. आपले धनुष्यबाण सरोवराच्या तीरावर रोवून ते सरोवरात उतरले. पाणी पिऊन झाल्यावर ते वर आले. येऊन बघतात तो त्या बाणाने जखमी झाल्यामुळे एक बेडूक रक्तबंबाळ होऊन पडला आहे. या प्रकाराने दु:खी होऊन रामाने त्याला विचारले, “अरे, तू ओरडला का नाहीस? ओरडला असतास तर मला समजले असते आणि तुझी अशी दुर्दशा झाली नसती.” यावर तो बेडुक म्हणाला, “श्रीरामा जेव्हा आम्हावर संकट येऊन कोसळते, तेव्हा आम्ही तुझा धावा करतो. आता प्रत्यक्ष रामच मारायला धावला तर दुसऱ्या कुणाचा धावा करायचा.” आज देशाची, समाजाची हीच परिस्थिती झालेली आहे. हावऱ्या, भ्रष्ट, फेकू वृत्तीचा बाण त्यांनी प्रजेच्या पोटात खुपसला आहे. अशा स्थितीत त्या समाजाविरोधात ओरडून काय होणार? असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ सदरातून केला आहे.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे चारित्र्य…, संजय राऊत यांचा भाजपावर ‘रोखठोक’ हल्ला

- Advertisement -

लोकांना प्रेरणा देणारे नेते राहिले नाहीत. जार्ज वाशिंग्टन याने अमेरिकेचे नेतृत्व केले. बऱ्याच वर्षांनी सन 1798 साली वार्धक्यामुळे वाशिंग्टनने निवृत्ती पत्करली व माऊंट व्हेरान येथे विश्रांतीसाठी जाऊन राहिले. त्यावेळी फ्रान्स अमेरिकेवर स्वारी करण्याच्या बेतात असल्याने प्रेसिडेंट आडाम्स याने वाशिंग्टनला पत्र लिहून कळवले की, “अमेरिकेचे सैन्य प्रबळ आहे, पण अगणित अशा सैन्यापेक्षा तुमच्या नावाचा प्रभाव अधिक आहे. तरी आपल्या नावाचा उपयोग करून घेण्याची आपली संमती असावी.” वाशिंग्टनच्या उदात्त वर्तनामुळे आणि श्रेष्ठ प्रतीच्या कर्तबगारीमुळे त्यांच्याविषयी त्यांच्या देशबांधवांना हा असा आदर वाटत असे. जगात वाशिंग्टनचे चारित्र्य नाही व रामाचे सत्यही उरले नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -