फडणवीसांच्या संमतीनेच राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याला घेरण्याची रणनीती?

मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

devendra fadnavis demand gave tukaram supe case to cbi for interrogation

भाजपच्या रडारवर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता आला असून लवकरच त्या नेत्याला तुरुंगात जावे लागेल, असा इशाराच भाजप नेते मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री उशिरा ट्विट करून दिला. मोहित कंबोज यांनी एकामागोमाग एक ट्विट करत महाविकास आघाडीतील त्या नेत्याला लक्ष्य केले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा बडा नेता जेलवारी करणार असल्याचे ट्विट करत मोहित कंबोज यांनी राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला घेरण्याची रणनीती आखली जात आहे का, या चर्चांना राजकीय वर्तुळात सध्या उधाण आले आहे.

मोहित कंबोज यांचे हे ट्विट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दबावतंत्र म्हणून आहे की त्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे, असा सवालही आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. संबंधित नेत्याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपण खुलासा करणार असल्याचे मोहित कंबोज यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याची देशात आणी परदेशात असलेली मालमत्ता, बेनामी कंपन्या, खास मैत्रिणीच्या नावावर असलेल्या मालमत्ता, अनेक खात्यांच्या माध्यमातून केलेला घोटाळा, कौटुंबिक उत्पन्न हे सगळे उघड करणार असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे, मात्र अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत, संजय पांडे यांच्या अटकेपूर्वी जसे ट्विट करत भाजपचे नेते किरीट सोमय्या सूचक इशारा द्यायचे, तसाच काहीसा इशारा हा आता कंबोज यांच्याकडून देण्यात आला आहे. ईडीच्या कारवाईबाबत जसे किरीट सोमय्यांना समजते त्याच पद्धतीने आता मोहित कंबोज यांना कुणकुण लागलेली असते असे यावरून समजते.

कोअर टीमच्या बैठकीत खलबतं?
मोहित कंबोज यांच्या ट्विटचा संबंध हा भाजपच्या नुकत्याच झालेल्या कोअर टीमच्या बैठकीशी लावला जात आहे. सागर बंगल्यावर भाजपच्या कोअर टीमची बैठक झाली. त्या बैठकीला भाजपचे कोअर टीमचे सदस्य, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते, मंत्री, मुंबईतील आमदार उपस्थित होते. दोन तास चाललेल्या भाजप कोअर टीमच्या बैठकीत त्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर कारवाई करण्यावर एकमत झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याने मोहित कंबोज यांच्याशी संबंधित काही खात्यांकडे माहिती मागवली. मग त्या माहितीसंदर्भात कोअर टीममध्ये चर्चा झाली असता राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याचा विषय बैठकीत आल्याचे समजते.

मोहित कंबोजही तसे भाजपचे वादग्रस्त नेते असून नवाब मलिक, संजय राऊतांनीही त्यांच्या विरोधात आधी गंभीर आरोप केले होते. काही वेळा मोहित कंबोज यांनी त्या दोघांना न्यायालयातही खेचले आहे. संजय राऊत, नवाब मलिकांनंतर आता त्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला सोडायचे नाही, असाही त्या बैठकीत सर्व भाजप नेत्यांचा सूर निघाला. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीच मोहित कंबोज यांना त्या राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात कारवाईसाठी मूक संमती दिल्याचे बोलले जात आहे. तुमच्याकडे पुरावे असतील तर त्या पद्धतीने त्याचा वापर करा. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीच्या त्या नेत्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता, परंतु कोअर टीममध्ये उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांकडून त्या राष्ट्रवादीच्या नेत्याला उघडं पाडण्याची रणनीती आखली गेल्यानंतर फडणवीसांनीही त्याला संमती दिली.

राष्ट्रवादीचा तो नेता आपल्याविरोधात षड्यंत्र, आरोप आणि चौकशीचा ससेमिरा लावत होता तर आता आपण गप्प का बसायचे, असा सवालही कोअर टीमच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा जर तुमच्याकडे त्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याविरोधात सिंचन घोटाळा, मनी लाँड्रिंगचे पुरावे असतील तर बाहेर काढा, असे आदेशच दिल्याचे समजते. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याविरोधात भाजपकडे पुरावे आहेत, मात्र केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या होकाराची भाजप वाट पाहत होती. या बैठकीत राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याला कोंडीत पकडण्याची रणनीती ठरली आहे. मोहित कंबोजांच्या विरोधात वेगवेगळ्या खात्यांकडून जर तो नेता माहिती मागवत असेल, तर त्या नेत्याचे कारनामेही आपण जनतेपुढे आणले पाहिजेत, असाही बैठकीत सूर होता.

आता कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार केलेल्या किंवा ज्यांनी जनतेचे पैसे लुबाडून खाल्ले आहेत, ज्यांनी देशात-परदेशात पैसे जमवले आहेत, अशा नेत्यांना पाठीशी घालायचे नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा तिसरा नेता भाजपच्या टार्गेटवर असेल, असे एका भाजपच्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तो राष्ट्रवादीचा बडा नेता कित्येक वर्षे राष्ट्रवादी पक्षात आणि सरकारमध्ये उच्च पदावर आहे. तोच जर भाजपच्या नेत्यांविरोधात माहिती मागवत असेल तर त्याला का सोडायचे, असा सूरही बैठकीत आळवला गेला. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा तो नेता कोण याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.