घरमहाराष्ट्रऐकावं ते नवलच! हिवाळी अधिवेशनाचा खर्च 100 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता

ऐकावं ते नवलच! हिवाळी अधिवेशनाचा खर्च 100 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता

Subscribe

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनासाठी सुमारे 95 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे त्या खर्चात आणखी वाढ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे

मुंबईः डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपूर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे पहिले अधिवेशन डिसेंबर 2019 मध्ये झाले होते. यानंतर मार्च 2020 आणि 2021 मध्ये कोरोना संसर्गामुळे राजधानी नागपुरात सलग दोन अधिवेशने होऊ शकली नाहीत. परंतु आगामी अधिवेशन खर्चिक ठरण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनासाठी 65 कोटी रुपये खर्च केले जात होते, मात्र यंदा हा आकडा 100 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनासाठी सुमारे 95 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे त्या खर्चात आणखी वाढ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिवेशनाच्या पूर्वतयारीबरोबरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार यांचे निवासस्थान आणि कार्यालय तसेच अधिकाऱ्यांचे निवासस्थान आणि कार्यालयासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात येते.

- Advertisement -

शहरातील आमदार निवासाव्यतिरिक्त नाग भवन, हैदराबाद हाऊस, रवी भवन, 160 गाळा, राजनगरचे 64 फ्लॅट, सीताबर्डी येथील बचत भवन, रविनगर आदी जागा ताब्यात घेऊन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व इमारतींचे नूतनीकरण करून शौचालये आणि इतर दुरुस्तीसह साहित्यही दिले जाते. सार्वजनिक बांधकाम विभागाने 95 कोटींचा खर्चाचा आराखडा तयार केला आहे. अधिवेशनाच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून संबंधित खात्याला तात्पुरत्या स्वरूपात सुमारे 45 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. 2019 पासून शहरात अधिवेशन झालेले नाही. अशा स्थितीत सर्वच इमारतींमध्ये डागडुजीची कामं आणि इतर अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिसरात सर्वत्र गवत आणि झाडे वाढली आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे खर्च वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. 2019 साली नागपूरला झालेल्या अधिवेशनासाठी 65 कोटी इतका खर्च करण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा 30 कोटींचा जास्त खर्च अपेक्षित आहे. खराब साहित्य नव्याने खरेदी करावे लागणार असून जीएसटी आणि सीएसआरच्या दरात वाढ झाल्याने हा खर्च वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्चाचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या खर्चाला मान्यता देण्यात येण्याची शक्यता आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होते, परंतु कोरोनामुळे 2020 आणि 2021 ला नागपूरमध्ये अधिवेशन झाले नाही. मात्र या वर्षी कोरोनाचे संकट नसल्याने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार आहे. हे अधिवेशन दोन आठवडे चालणार असून, यासाठी प्रशासनाने आपली तयारी सुरू केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर येथे जाऊन अधिवेशनाचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी निधीची काळजी न करता योग्य नियोजन करावे. तसेच खर्चाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.

- Advertisement -

दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी दुरुस्ती, देखभाल आणि साहित्य खरेदी सीएसआर दराने केले जाते. ही दर यादी सार्वजनिक बांधकाम विभाग ठरवते. ही दर यादी महागाईच्या प्रमाणात दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढवली जाते. यंदा कागद, रंग, वाळूसह अन्य बांधकाम साहित्यात वाढ झाल्याने विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीलाही महागाईचा सामना करावा लागणार आहे. मात्र, महागाई आटोक्यात आणण्याबरोबरच कामांचा दर्जा निश्चित करण्यासाठी व्हीएनआयटी व्यवस्थापनाकडून मदतीचाही विचार केला जात आहे. गेल्या तीन वर्षांत साहित्याच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. यासोबतच सलग दोन वर्षे अधिवेशन नसल्याने नूतनीकरण आणि दुरुस्तीमध्ये मोठी कसरत करावी लागत आहे. यात खर्च स्वाभाविकपणे वाढणार आहे. सर्वेक्षण करून सविस्तर आराखडा देण्याच्या सूचना सर्व उपविभागांना देण्यात आल्या आहेत. सर्व अहवाल आल्यानंतर खर्चाची स्पष्ट माहिती बाहेर येऊ शकणार आहे.


हेही वाचाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् तत्काळ 7 कोटी मंजूर; वाचा नेमके काय घडलं?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -