देशातील पहिली खासगी रेल्वे कोईम्बतूरहून शिर्डीत दाखल

810 प्रवाशांनी केला प्रवास; महिन्यातून तीनदा धावणार

भारत गौरव योजनेंतर्गत देशातील पहिल्या खासगी रेल्वे सेवेला मंगळवारी (ता.14) कोईम्बतूर येथून रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ही रेल्वे आज (गुरुवारी ता.16) सकाळी साडेसहा वाजता शिर्डीतील साईनगर रेल्वेस्थानकावर दाखल झाली आहे.

या पहिल्या खासगी रेल्वेत एकूण 810 प्रवाशांनी प्रवास केला आहे. रेल्वे प्रशासनाच्यावतीने ही रेल्वे एका खासगी सर्व्हिस प्रोव्हायडरला दोन वर्षांच्या करारावर भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या या उपक्रमाला प्रवाशांचा प्रतिसाद लाभला तर येत्या काळात आणखी काही खासगी रेल्वे धावण्याची शक्यता आहे. या पहिल्यावहिल्या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.

या खासगी रेल्वेतून एकाच वेळी दीड हजार प्रवासी प्रवास करु शकतात एवढी क्षमता असून तिला एकूण 20 डबे आहेत. विशेष म्हणजे या रेल्वे मार्गावर नियमित धावतात त्यांना जेवढा तिकीट दर आहे, तेवढाच तिकीट दर या रेल्वेला असणार आहे. ही रेल्वे महिन्यातून तीनदा कोईम्बतूर-शिर्डी या मार्गावर धावणार आहे. या रेल्वेतील प्रवाशांना साईबाबा मंदिरात दर्शनासाठी व्हीआयपी व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे त्यांना रांगेत जास्तवेळ उभे राहण्याची गरज भासणार नाही.

तिकीट दर किती?

खरेतर ही खासगी रेल्वे असल्याने प्रवास भाडे किती असणार असा प्रश्न प्रवाशांना पडतो. मात्र काळजी करण्याचे कारण नाही. या रेल्वेमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून देखील सामान्य रेल्वेत आकारले जाणारे भाडे आकारले जाते. यामध्ये नॉन एसीसाठी अडीच हजार रुपये, थर्ड एसीसाठी पाच हजार रुपये, सेकंड एसीसाठी सात हजार रुपये तर फर्स्ट एसीसाठी दहा हजार रुपये आकारण्यात येणार आहे.