शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यातील धरणे निम्मी भरली

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

the dams is half full after heavy rainfall in the state
शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यातील धरणे निम्मी भरली

राज्यात गेल्या आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास सर्व धरणे निम्मी भरली. यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील तलाव क्षेत्रात पाऊस झाल्याने तलावातील पाणी साठ्यातही वाढ झाल्याने मुंबईकरांची एप्रिल २०२२ पर्यंतची पाण्याचीही चिंता मिटली आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये सध्या ४८.४१ टक्के अर्थात निम्मा पाणीसाठा आहे. आठ दिवसांपूर्वी सर्व धरणांमध्ये सरासरी ३२ टक्के पाणीसाठा होता. मात्र गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा पाणीसाठी १६ टक्क्यांनी वाढून तो ४८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठी ९ टक्क्यांनी जास्त असून यामुळे राज्यातील बऱ्याच भागात पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.

मुंबई परिसरातही दमदार पाऊस पडल्याने मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर, अप्पर वैतराणा, तानसा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या सर्व सात तलावांमधील पाण्याची पातळीही वाढली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षातील या तलावातील हा सर्वाधिक पाणीसाठा आहे.

जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने मुंबईतील धरणात जेमतेम १८ टक्के एवढाच पाणीसाठा होता. मात्र गेल्या आठवड्याभरातील पावसामुळे पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे  एप्रिल २०२२ अखेरपर्यंत मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागणार नाही.

विभागवार धरणांमधील पाणीसाठा 

कोकण: ५८.७ टक्के
पुणे:  ६४.१५ टक्के
नाशिक : ३१.२७ टक्के
औरंगाबाद :३३.७३ टक्के
अमरावती : ४६.१५ टक्के
नागपूर : ३६. ४६ टक्के
एकूण सरासरी पाणीसाठा : ४८.४१ टक्के