धोका वाढला, शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव

corona

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच ‘एच-3 एन-2 या इन्फ्लूएंझा विषाणूचाही शहरात शिरकाव झाला आहे. त्यामुळे नाशिककरांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली असून. महापालिकेने शहरातील खासगी लॅबमधील स्वाईन फ्लुच्या रुग्णांचे अहवाल तपासल्यानंतर त्यात ‘एच-3 एन-2’चेही चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या महिनाभरापासून राज्यासह देशभरात सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनासारखी लक्षणे दिसत असल्याने राज्य शासनाची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. या रोगाचा शहरातील पहिला रुग्ण फेब्रुवारीत आढळला होता. आता चौथा रूग्ण सिडकोत सापडला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार आहेत. या चारही रुग्णांची प्रकृती चांगली असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही. तोच सध्या या विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. हवामानातही बदल घडत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे.
ही बाब विचारात घेऊन शासकीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

दरम्यान ‘एच3 एन2’ या विषाणूशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभागाने नाशिक महापालिकेला अलर्ट जारी केला आहे. या रुग्णांच्या तपासणीसाठी मोहीम सुरू करण्याचेही निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरात या विषाणुच्या रुग्णांचा शोध सुरू केला आहे. ‘एच-3 एन-2’ या विषाणूची आणि स्वाईन फ्लुची लक्षणे सारखीच असल्याने वैद्यकीय विभागाने 1 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत शहरात आढळून आलेल्या स्वाईन फ्लुच्या 17 रुग्णांच्या नमुन्यांची फेरतपासणी केली. त्यात शहरात एच-3 एन-2 या विषाणूचे चार रुग्ण आढळून आले.

काळजी घेण्याचे आवाहन

नाशिक शहरात ‘एच-3 एन-2’ विषाणूसोबतच कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने या दोन्ही विषाणूंचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे. सोमवारी एकाच दिवशी शहरात सहा रुग्ण आढळले होते. त्यापाठोपाठ पुन्हा कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे. यातील एका रुग्णावर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 30 झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविडबाबतही पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.