घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहापालिकेच्या अव्यवस्थेच 'नाटक' संपेना; महाकवी कालिदास कलामंदिर एसी बंद प्रकरण

महापालिकेच्या अव्यवस्थेच ‘नाटक’ संपेना; महाकवी कालिदास कलामंदिर एसी बंद प्रकरण

Subscribe

नाशिक : व्यावसायिक नाटकांसाठी ज्येष्ठ व दिग्ग्ज कलावंत महाकवी कालिदास कलामंदिरात येत असले तरी या ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा बंदसह इतर सुविधा मिळत नाहीत. परिणामी, अनेक दिग्गज कलावंत कालिदास कलामंदिरांमधील असुविधेबाबत नाराजी व्यक्त करतात. जर दिग्गज कलावंतांनी कालिदास कलामंदिरमध्ये येणे बंद केले तर नाशिकमधील रसिकांनी नाट्यप्रयोग कुठे पाहायला जायचे, असा प्रश्न रसिकांनी उपस्थित केला आहे.

महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यात महापालिकेने साडेनऊ कोटी रुपयांचा चुराडा केला. मात्र, कलाकारांना हव्या तशा आजही सुविधा देण्यात कालिदास कलामंदिर असमर्थ ठरत असल्याच्या तक्रारी रोजच वाढत आहेत. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक सुरू असताना अनेक वेळा वीज गेली. कलाकार तर अगदी हतबल झाले होते. त्यामुळे प्रियदर्शन जाधव याने फेसबुकवर कालिदासविषयी जाहीरपणे चर्चा सुरू केली. त्याची री अनेक कलाकार ओढत असून, कालिदासमध्ये सुविधा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुमित राघवन याने याबाबत ट्वीट केले. यात कालिदासबाबत काही सूचना केल्या आहेत.

- Advertisement -

’इतके करोडो रूपये खर्च करण्याआधी जरा आमच्या व्यवसायातल्या जाणकार लोकांचा सल्ला का घेत नाही महापालिका? सौंदर्यदृष्टीचा एवढा का अभाव? यावर सोशल मीडियावर सखोल चर्चा झाली होती. त्यानंतर भरत जाधव, प्रियदर्शन जाधव तसेच सुमित राघवन यांनीही असुविधांवर शिक्कामोर्तब केले. महाकवी कालिदास कलामंदिरात सत्रानुसार भाडे अनामत रक्कम अशा विविध मार्गाने एका प्रयोगासाठी सुमारे २० हजार रुपये भाडे घेतले जाते. त्यातुलनेत सुविधा दिल्या जात नसल्याचे समोर आले आहे. संध्या छाया नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी रविवारी (दि.१४) सायंकाळी प्रेक्षकांनी कालिदास कलामंदिरात गर्दी केली होती. मात्र, वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने प्रेक्षक हैराण झाले. नाट्यगृहाची दारे बंद असल्याने आणि वातानुकूलित यंत्रणा बंद अवस्थेत असल्याने प्रेक्षकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ही बाब कलावंतांना समजताच त्यांनी कर्मचार्‍यांना नाट्यगृहाची दारे उघडे ठेवण्यास सांगितले. तरीही, नाट्यगृहात थंड हवा नसल्याने प्रेक्षकांची अस्वस्थता अधिकच वाढत गेले. इंटरवल होताच अभिनेते वैभव मांगले, अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्यासह कलावंतांनी प्रेक्षकांसमोर येत दिलगिरी व्यक्त केली. आम्हालाही नाट्यगृहात एससी सुरू नसल्याचे माहिती नव्हते.

प्रयोग रद्द झाला तरी चालेल पण आधी एसी चालू की बंद याची शहानिशा करा मगच तिकीट काढा, असे आवाहन वैभव मांगले यांनी प्रेक्षकांना केले. त्यानंतर काही प्रेक्षक थांबले तर, तब्बल ६० प्रेक्षकांनी आपल्या तिकिटांचे पैसे परत घेतले.
महाकवी कालिदास कलामंदिरात नाट्यप्रयोग झाल्यानंतर कलाकारांना भोजन उभे राहूनच करावे लागते. नाट्य मंदिरात कलावंतांसाठीच्या कक्षात बसायला पुरेशी जागा नाही. स्वच्छतागृहांची अवस्थाही बिकट आहे. खुद्द प्रेक्षकांनाही ही बाब ज्ञात आहे. प्रदीर्घ काळापासून वारंवार मागणी करूनही ही व्यवस्था सुधारण्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे सांगत अभिनेता प्रशांत दामले यांनी महापालिकेच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने स्वच्छतेकडे लक्ष दिले. मात्र, आजही स्वच्छतेबाबत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, असे कलावंत व रसिक म्हणत आहेत.

कालिदास कलामंदिरमध्ये सुविधांमुळे कलावंत व रसिकांना त्रास होत आहे. यासंदर्भात आयुक्त व उपायुक्तांना अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. एसी, भाडेवाढीच्यासुविधा स्थायी समितीच्या नावाखाली प्रश्न प्रलंबित आहे. कॅन्टीन बंद असल्याने रसिकांची नाराजी आहे. कालिदास कलामंदिर चालू राहील की नाही, असा प्रश्न ठेकेदार आणि रसिकांसमोर आहे. : सुनील ढगे, प्रमुख कार्यवाह, मराठी नाटय परिषद, नाशिक शाखा

कालिदासमधील एसी सिस्टीम तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती. इलेक्ट्रिकल विभागातर्फे सोमवारी काम सुरु केले आहे. मेंटनन्सचे काम केले जात आहे. मंगळवारी (दि.१६) दुपारपर्यंत एसी सुरू होईल. : मनोज घोडे-पाटील, उपायुक्त, नाशिक महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -