निवडणूक आयोगाचा निर्णय घटनेनुसारच : रामदास आठवले

Ramdas Athawale
रामदास आठवले

नाशिक : डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वानुसारच निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत निर्णय घेतलेला असून’ लोकशाही प्रणालीमध्ये बहुमताला किंमत असते याचे भान उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी ठेवायला हवे होते असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले

महाराष्ट्रातील सर्वात मोठे जैन मंदिर असलेल्या लॅमरोड परिसरातील कलापूर्णम तीर्थस्थान याठिकाणी रामदास आठवले यांनी भेट दिली. याप्रसंगी बोलताना आठवले म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात आमची भाजप व शिवसेनेसोबत युती असून आगामी लोकसभा, विधानसभा सह स्थानिक पातळीवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका यादेखील महायुतीच्याच माध्यमातून लढवण्याच्या आमचा निर्णय आहे. सध्या रिपब्लिकन पक्ष हा व्यापक पक्ष झाला असून अनेक जाती धर्माचे लोक या पक्षात सामील होत असून, नागालँड, मेघालय, त्रिपुरा सारख्या राज्यातही आमच्या पक्षाला जनाधार मिळत असल्याने तेथील निवडणुकांमध्ये देखील आम्ही पूर्ण ताकतीने उतरत आहोत.

 काँग्रेसने जे ७० वर्षात केले नाही ते भाजपने ९ वर्षात करून दाखवले. शिवाय देशातील सरकार हे सर्वधर्मसमभावाचे सेक्युलर वादी असून संविधानामुळे जातीपाती मधील संघर्ष मोडीत निघालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर लोकसभेच्या मंदिरात प्रवेश करताना संविधानाच्या प्रतीवर डोके ठेवून कारभार करण्याचे वचन जनतेला दिले व त्यानुसार सर्व काही होत आहे. मात्र, त्यामुळे संविधान खतरे मे है हा काँग्रेस व विरोधकांचा प्रचार खोटा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कसबापेठ व चिंचवड या पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.