नव्या वर्षात राजकीय रणधुमाळी आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगणार

bjp

नव्या 2022 या वर्षात राज्यसभा, विधान परिषदेसह राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे नवे वर्ष राजकीय रणधुमाळीचे ठरणार असून या वर्षात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि मित्र पक्ष असा सामना रंगणार आहे.

महाविकास आघाडीने तिसर्‍या वर्षात पदार्पण केले आहे. परिणामी स्थानिक निवडणुकीत सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराबद्दल जनतेचा कौल आघाडीसाठी महत्वाचा ठरणार आहे. तर 2024 ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांना मोर्चेबांधणी, युती अथवा आघाडीसाठी हे वर्ष निर्णायक ठरणार आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा खासदारांची मुदत यावर्षीच्या उत्तरार्धात म्हणजे जुलै महिन्यात संपत आहे. त्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे. आघाडी आणि भाजपसाठी राज्यसभेची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. याशिवाय वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सात जागांसाठी निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीतही आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. तसेच महाराष्ट्र विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून गेलेल्या नऊ सदस्यांची मुदत जुलै 2022 मध्ये संपत आहे. त्यात उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा समावेश आहे.

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिकसह 10 महापालिकांची मुदत येत्या तीन महिन्यात संपत आहे. त्यामुळे या 10 महापालिकांसह अन्य 13 अशा एकूण 23 महापालिका, 27 जिल्हा परिषदा, त्या अंतर्गत 309 पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यात वर्षभर राजकीय वातावरण तापलेले असणार आहे.