घरमहाराष्ट्रआरक्षणाच्या गोंधळामुळे अकरावीचे प्रवेश रखडले

आरक्षणाच्या गोंधळामुळे अकरावीचे प्रवेश रखडले

Subscribe

मराठा आरक्षण व संवर्णातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळांना दिलेल्या आरक्षणामुळे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया रखडल्यानंतर आता आरक्षणामुळे अकरावी प्रवेशाचा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यातच नामांकित कॉलेजात जागा वाढल्याने आरक्षित जागांचा पेच निर्माण झाला आहे. यामुळे प्रवेशासाठी उपलब्ध होणार्‍या आरक्षित जागांचा तपशील शिक्षण उपसंचालक कार्यालयाला जाहीर करता आलेला नाही. परिणामी मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आठवडाभरात जाहीर होण्याची वेळ आली तरी प्रवेशासाठी उपलब्ध जागा शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आल्या नाहीत.

मराठा आरक्षण 16 टक्के आणि सवर्ण आरक्षण 10 टक्के लागू झाल्याने आरक्षणाची टक्केवारी 103 टक्क्यांवर पोहचली होती. त्यामुळे शिक्षण विभागाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी व्यवस्थापन कोट्यातील 10 टक्के जागा कमी केल्या. यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अल्प दिलासा मिळाला असला आहे. मात्र दहावीचा निकाल घसरल्याने शिक्षण विभागाने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील 98 कॉलेजांमध्ये 6622 जागा वाढवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

मात्र या जागा वाढल्याने आरक्षणाच्या कोट्यातही बदल झाला. त्यामुळे आरक्षित वर्गासाठी व खुल्या प्रवर्गासाठी नेमक्या किती जागा असतील याचे गणित जुळवण्यात शिक्षण मंडळाला वेळ लागत आहे. त्याचा परिणाम अकरावी प्रवेश प्रक्रियेवर होत आहे. आरक्षणाचा ताळमेळ न जुळल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना किती जागा उपलब्ध होणार आहेत, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे कॉलेज निवडणे व पसंतीक्रम कसे भरायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. एकूण जागांची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू असून ते एक दोन दिवसात पूर्ण होईल, असे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -