घरमहाराष्ट्रसत्तेसाठी भाजपाचे समर्थन घेणाऱ्या शिंदे गटाचे अस्तित्व केवळ पाठिंब्यापुरतेच!

सत्तेसाठी भाजपाचे समर्थन घेणाऱ्या शिंदे गटाचे अस्तित्व केवळ पाठिंब्यापुरतेच!

Subscribe

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक आमदार वारंवार सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात मात्र या शिंदे गटावर भाजपाचाच वरचष्मा असल्याचे चित्र आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपासून सध्याच्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत राजकीय घडामोडींवर नजर टाकली तर, सत्तेसाठी भाजपाचे समर्थन घेणाऱ्या शिंदे गटाचे अस्तित्व केवळ पाठिंब्यापुरतेच असल्याचे जाणवते.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर करताच, सर्वांच्या भुवया उंचावल्या. निम्मे संख्याबळ असतानाही राज्याचे प्रमुखपद भाजपाने दिले म्हणून सर्वांना आश्चर्य वाटले. पण अंधेरी निवडणूक, शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणूक आणि आताची कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाच सूत्रे हलवत असल्याचे दिसते.

- Advertisement -

अंधेरी पूर्व मतदारसंघ शिवसेनेचा असतानाही यावर शिंदे गटाने दावा सांगितला नाही. या जागेवर भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली. पण नंतर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहनानंतर मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. पण या सर्व घडामोडींमध्ये शिंदे गटाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीतही हीच स्थिती होती. महाविकास आघाडीने पाचही जागांवर उमेदवार जाहीर केले होते. तर, भाजपाने तीन जागा थेट लढविल्या. पण उर्वरित दोन जागांवर शिंदे गटाचे उमेदवार दिसले नाहीत. त्यातही जी कोकणातील जागा भाजपाच्या नावावर आली, तोही विजयी उमेदवार प्रत्यक्षात मूळचा शिवसेनेचाच आहे. बदलापूर येथे राहणारे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षक सेनेच्या माध्यमातून 2017मध्ये कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. त्यावेळी पराभव झाला असला तरी ज्ञानेश्वर म्हात्रे दुसऱ्या स्थानी होते. त्यांचे बंधू वामन म्हात्रे हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख आहेत.

आताही कसबा पेठच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही जागा भाजपा लढविणार आहे, कारण या भाजपाकडे होत्या. त्यामुळे तिथेही शिंदे गटाची भूमिका केवळ भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचीच आहे. याची सल आता दिसू लागली आहे. अमरावतीतील जागा भाजपाने गमावल्यानंतर, शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यानेच भाजपचा पराभव झाला, असे सांगत शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी खदखद व्यक्त केली आहे.

- Advertisement -

बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपाचा प्रयत्न, मविआ ठाम
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. मात्र, महाविकास आघाडी मात्र ही निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. यासाठी त्यांनी पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूर (नांदेड) पोटनिवडणुकीचा दाखला दिला आहे. पंढरपुरात भारत भालकेंच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे राष्ट्रवादीकडून उभे होते तर त्यांच्याविरुद्ध भाजपाने समाधान आवताडे यांना तिकीट दिले होते.

कोल्हापूर उत्तर मतदारसघांत काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात भाजपाने सत्यजित ऊर्फ नाना कदम यांना उमेदवारी दिली होती. तर, देगलूरमध्ये रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्यावर काँग्रेसने त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली. शिवसेनेतून भाजपात आलेल्या सुभाष साबणे यांनी जितेश अंतापूरकर यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने का घेतली माघार?
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी होण्याची संधी भाजपाला आहे. तथापि, अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांचे पारडे जड होते. शिवाय, राज्यातील सत्तांतरानंतरची मोठी निवडणूक होती. त्यामुळे भाजपाने सोयीनुसार माघार घेतल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासस दानवे यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -