वर्षा निवासस्थानी झालेला खर्च आमच्या परिवाराचा नाही : खा. श्रीकांत शिंदे

shrikant shinde

नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जेवणावर तीन महिन्यात तब्बल दोन कोटी 38 लाखांची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. मात्र वर्षा निवासस्थानी जो खर्च झाला आहे तो आमच्या परिवाराचा नसल्याचे स्पष्टीकरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.

खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिकमध्ये खासदार रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. तीन महिन्यात तब्बल दोन कोटी 38 लाखांची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले होते. यावर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पूर्वीचे मुख्यमंत्री नागरिकांना भेटत नव्हते मात्र आता मुख्यमंत्री नागरिकांना उपलब्ध होतात, त्यांच्या समस्या ऐकून घेतात.

लोक दूरवरून मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येतात मग त्यांना चहा आणि खायला द्यायचे नाही का? असे म्हणत शिंदे यांनी अजित पवारांचे नाव न घेता टोला लगावला. गेली अडीच वर्ष ठप्प झालेली कामे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहेत. सहा महिन्यांत ६ वेळा मुख्यमंत्री नाशिकला येऊन गेले. यापूर्वी फक्त ऑनलाईन कार्यक्रम होत होते आता ऑफलाईन सुरू आहे. विकासाचे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. परंतू राजकारणाचा स्तर खालावला आहे, कशा प्रकारच्या टीका करायच्या हे देखील समजले पाहिजे असे ते म्हणाले. कोविडच्या नावाखाली अडीच वर्षात विकासात राज्य पिछाडीवर पडले. इतर राज्य आपल्या पुढे निघून गेले. म्हणून आता मुख्यमंत्री इतका वेळ काम करत आहेत. त्यांच्या कामाचा झपाटा बघून विरोधकांचे पाय घसरत चालले आहे. तर ते काय करतील त्यांच्या पक्षासाठी, त्यांच्या गटासाठी तो त्यांचा प्रश्न असून मला त्यावर बोलायचे नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचे शिंदे यांनी टाळले.

सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी

यावेळी कांदा प्रश्नावर श्रीकांत शिंदे म्हणाले कि, मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये कांद्याच्या बाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि सर्व कांदा उत्पादकांच्या मागे मुख्यमंत्री खंबीर उभे आहेत. कांदा उत्पादकांच्या मागे राहून त्यांच्या समस्या सोडविण्यात येईल. दादा भुसे हे आंदोलकांशी बोलले असून कांदा उत्पादक जर भेटले तर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हणाले. तसेच निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या प्रक्रियेत आणि अनुषंगाने जे जे निर्णय पक्ष म्हणून आम्हाला घेता येतील ते आम्ही घेऊ असेही ते म्हणाले.