मुंबईत १४७ वर्षांपूर्वी धावली होती घोड्यांची ट्राम, तिकिट अवघे ३ आणे 

horse tram

मुंबईत घोड्यांनी ओढल्या गेलेल्या ट्रामच्या सेवेला सुरूवात होऊन आज म्हणजे रविवार ९ मे रोजी १४७ वर्षे पुर्ण झाली. अवघ्या ३ आणे तिकिटाने सुरूवात झालेली पहिली ट्राम बोरिबंदर ते पायधूनी दरम्यान धावली. मुंबईत त्यावेळच्या बॉम्बे शहरात वाहतूकीचे साधन म्हणजे शीघ्रम म्हणजे घोड्यांने ओढले जाणारे वाहन तर रेकला म्हणजे बैलांनी ओढले जाणारे वाहन तर पालखी हे आणखी एक माध्यम. त्यामध्येच घोड्याने ओढल्या जाणाऱ्या घारीची भरही त्यात पडली. या घारी वाहनाचे पुढे जाऊन विक्टोरिया असे नाव पडले. पण त्यानंतर आलेल्या घोड्यांच्या ट्रामने मुंबईतील वाहतूकीचे चित्रच पालटले. पुढे घोड्याने ओढलेल्या ट्रामचे रूपांतर हे इलेक्ट्रिक ट्राममध्ये झाले. आता याच ट्रामच्या मॉडेलची प्रतिकृती ही मुंबईकरांना ट्रामच्या इतिहासाची आठवण करून देण्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नजीकच्या उद्यानात ठेवण्यात आली आहे.

ताफ्यात २०० घोडे 

१८६५ मध्ये अमेरिकन कंपनीने सरकारकडे घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ट्राम सेवेसाठीचा परवाना मिळावा म्हणून विनंती केली होती. त्यासाठीचा परवानाही मिळाला पण त्यावेळी हा प्रकल्प काही कारणाने ही सेवा रखडली. ही कंपनी पुढे दिवाळखोरीत गेल्याने हा प्रकल्प रखडला. त्यानंतर १८७३ मध्ये बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना करण्यात आली. या ट्रामवे कंपनीला २० वर्षांसाठीचा परवाना देण्यात आला. बॉम्बे ट्रामवे कंपनी आणि महापालिका यांच्यातील हा करार होता. त्याचाच भाग म्हणून बॉम्बे ट्रामवेज एक्ट १८७४ अस्तित्वात आला. एक घोड्याने ओढली जाणारी ट्राम आणि दोन घोड्यांनी ओढली जाणारी ट्राम असे ट्रामचे प्रकार होते. या कंपनीने २० घोडागाड्या आणि २०० घोड्यांनी कंपनीची सुरूवात केली.

अवघे ३ आणे तिकिट 

मुंबईत ९ मे १८७४ रोजी घोड्यांनी ओढल्या जाणारी ट्राम धावली. बोरीबंदर ते पायधुनी व्हाया काळबादेवी अशी पहिली फेरी यादिवशी झाली. कुलाबा पायधूनसाठी ३ आणे इतके तिकिट होते. कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट, पायधुनी ते बोरीबंदर आणि बोरीबंदर ते काळबादेवी-पायधुनी या मार्गावर घोड्यांनी ट्राम खेचली. पहिल्याच दिवशी ४४ घोड्यांसह ६ ट्राम गाड्यांनी ४३ फेर्‍या केल्या. या एकुण ४५१ प्रवाशांकडून ८४ रुपये ९ पैसे जमा झाले.

या ट्राममध्ये कंडक्टरने फक्त पैसे जमा केले पण तिकिट दिले नाही. त्यावेळी कोणत्या प्रवाशाने पैसे दिले का ? हे तपासायचीही सोय नव्हती. अवघ्या चार महिन्यांनंतर ट्रामला तिकिट आकारण्यात आले. त्याचा परिणाम हा ट्रामच्या उत्पन्नातही दिसू लागला. उत्पन्न वाढताच ट्रामचे तिकीट कमी करुन एक आणा करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. ट्रामच्या वेगाबद्दल आणि तिकिटाबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच या सेवेवर प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले.

तक्रारीसाठी वृत्तपत्राचे माध्यम 

ट्राम सेवेबाबत जर कोणत्याही प्रवाशाला सूचना करायची असेल तर फक्त वृत्तपत्र हेच माध्यम होते. वृत्तपत्रातून येणाऱ्या सूचनांची दखल ट्रामवेज कंपनीकडून घेतली जायची. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये १९०३ साली एक पत्र आले, ज्यामध्ये आसन क्षमतेबाबतच्या कमाल मर्यादेचा उल्लेख करण्यात आला होता. वृत्तपत्रात २८ जुलै १९०३ रोजी छापून आलेल्या पत्रात मागणी करण्यात आली होती की, ट्रामच्या बेंचवर केवळ चार जणांनाच बसण्याची परवानगी असावी. पाचव्या प्रवाशाला बसण्याची परवानगी मिळू नये असा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला होता. जरी पाचवी प्रवासी महिला असली तरीही ही परवानगी देण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यावर ट्रामवेज कंपनीनेही उत्तर दिले. ज्यांना पाच जणांचा बेंचवरील प्रवास मान्य नाही, त्यांनी आपल्या स्वतःच्या गाडीने प्रवास करावा असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले होते. तब्बल ३१ वर्षे ही ट्रामसेवा सुरू होती. तब्बल ३१ वर्षांच्या सेवेनंतर १९०७ रोजी ही ट्राम बंद झाली. पुढे मुंबई महापालिकेने १९०५ मध्ये बॉम्बे इलेक्‍ट्रिक सप्लाय ऍण्ड ट्राम्वेज कंपनी लिमिटेड महापालिकेने ताब्यात घेतली.