अमर महल ते ट्रॉम्बे जलबोगद्याचा पहिला टप्पा पूर्ण; कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, गोवंडीतील पाणीपुरवठा सुधारणा

मुंबई महापालिकेने अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंत ५.५२ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ३.६ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम शुक्रवारी पूर्ण झाले.

मुंबई महापालिकेने अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंत ५.५२ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ३.६ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम शुक्रवारी पूर्ण झाले. उर्वरित जलबोगद्याचे काम ऑक्टोबर २०२४ पर्यन्त पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी भागातील पाणी पुरवठ्यात निश्चित सुधारणा होणार असल्याचा दावा पालिकेतर्फे केला जात आहे.

विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत कोविडचा संसर्ग असतानाही पालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या आदेशाने महापालिकेने कोस्टल रोड प्रमाणेच या जलबोगद्याचे काम सुरू ठेवत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले. या जलबोगदा प्रकल्प अंतर्गत अमर महल येथील हेडगेवार उद्यान व आर. सी. एफ. कॉलनी येथील ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय येथे अनुक्रमे सुमारे ८१ मीटर व १०५ मीटर खोलीची दोन कूपके बांधण्यात आलेली आहेत. भाभा अणू विज्ञान संशोधन केंद्र (भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर) येथील ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशय येथील सुमारे ११० मीटर खोलीच्या तिसऱ्या कूपकाचे काम प्रगतिपथावर आहे.

बोगद्याच्या खोदकामासाठी हेडगेवार उद्यान येथील कूपकात बोगदा खनन यंत्र (TBM) उतरवून या यंत्राच्या सहाय्याने जलबोगदा खोदकामाचा शुभारंभ राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ६ मार्च २०२१ रोजी करण्यात आला होता. जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर खोलीवर हा जलबोगदा बांधण्यात येत आहे. त्याचा व्यास ३.२ मीटर इतका आहे. या बोगद्याच्या खोदकामात अनेक भूगर्भीय अडचणी आलेल्या असताना देखील जानेवारी २०२२ मध्ये विक्रमी ६५३ मीटर खोदकाम करण्यात आले होते.

त्याचवेळी एकाच दिवसात ४० मीटरपेक्षा अधिक खोदकाम करण्याची कामगिरी देखील एकाच आठवड्यात दोनवेळा करण्याची किमया महापालिकेने साध्य केली होती. पहिल्या टप्प्यातील ३.६ किलोमीटर खोदकाम शुक्रवारी विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पाचे सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झालेले असून ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी तांत्रिक सल्लागार मेसर्स टाटा कन्सल्टींग इंजिनियर्स लिमिटेड यांची प्रकल्प सल्लागार व मेसर्स पटेल इंजिनियरिंग लिमिटेड यांची कंत्राटदार म्हणून महापालिकेतर्फे नेमणूक करण्यात आलेली आहे.


हेही वाचा – बोरिवली, दहिसरमधील ‘या’ ठिकाणी 10 मे रोजी पाणी नाही