मुंबईतील दहिसर नदीवरील वाहतूक पुलाचा पहिला टप्पा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खुला

बोरिवली येथील श्रीकृष्ण नगरात, पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून दहिसर नदीवर पुनर्बांधणी होत असलेल्या वाहतूक पुलाचा पहिला टप्पा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आज सायंकाळी समारंभपूर्वक खुला करण्यात आला.

दुसऱ्या टप्प्यातील पुलाच्या कामाचा काही भाग वन विभागाच्या (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) अंतर्गत येत आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. सदर प्रस्ताव प्रगतीपथावर आहे. वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त होताच दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ११.३० मीटर रुंदीच्या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

याप्रसंगी, भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, शिवसेनेचे ( शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपआयुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, आर/मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडिण्यपुरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये :

बोरिवली (पूर्व) येथील श्रीकृष्ण नगर येथील दहिसर नदीवरील पूल हा पश्चिम द्रुतगती महामार्ग व श्रीकृष्ण नगर, नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, अभिनव नगर, शांतिवन या भागाला जोडणारा पूल आहे. या परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी हा एकमेव महत्त्वाचा पूल आहे. सदर पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने सदर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

एप्रिल २०२२ मध्ये जुना पूल निष्कासित करुन त्यानंतर पुलाचे विस्तारीकरण व पुनर्बांधणीचे काम तातडीने सुरु करण्यात आले. सदर संपूर्ण पुलाचे बांधकाम इंटिग्रेटेड डेक स्लॅब व ब्रीज पीलर पद्धतीने करण्यात येत आहे. पूर्ण पुलाची एकूण लांबी ४१.५ मीटर इतकी आहे. यामध्ये उत्तर व दक्षिण वाहिनीकरिता प्रत्येकी २ मार्गिका आहेत. स्पॅन लांबी ही १३.५० मीटर, १३.६० मीटर आणि १३.५० मीटर इतकी आहे.

या संपूर्ण पुलापैकी, पहिला टप्पा ११ मीटर रुंदीचा असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी २००० घन मीटर काँक्रिट वापरात आले आहे. तसेच ४९० मेट्रिक टन लोखंड (रिइन्फोर्समेंट), ३०० मेट्रिक टन डांबर मिश्रण वापरात आले आहे. वाहतुकीसाठी या पुलाचे आत्यंतिक महत्त्व लक्षात घेता, पहिला टप्पा जलदगतीने पूर्ण करण्यात आला असून आता तो खुला देखील करण्यात आला आहे.


हेही वाचा : काळजी घ्या; ठाण्यात कोरोना विषाणूचे थैमान, रुग्णांची संख्या ५८ पार