भाजपच्या निष्ठावंतांचे मुक्त चिंतन नेतृत्वालाच सवाल ‘असं कसं बा चालेल?’

संधीसाधू आयारामांमुळे भाजपच्या परंपरागत मतदारांमध्ये फूट, बंडखोरीचा धोका!

bjp logo
भाजप

राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेल्या मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार मागे घेत भाजपने पराभवाची नामुष्की टाळली होती, मात्र त्यानंतर झालेल्या विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भाजपला स्वत:च्या पक्षातून दिलेले उमेदवारही निवडून आणता आले नाहीत, तर आयातीत उमेदवारांचा विजय आपल्याच पक्षाचा आहे असे सांगावे लागले. याशिवाय कसबा आणि चिंचवड या मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तर सत्ता हाती असून आणि पक्ष व प्रशासनाच्या यंत्रणेसोबत प्रचंड पैशांचा वापर झाल्याचा आरोप सहन करूनही कसाबसा टोकावरच्या एका विजयावर समाधान मानावे लागले. या राजकीय वस्तुस्थितीवर भाजपच्या निष्ठावंत विधानसभा सदस्यांनी मुक्त चिंतन करताना नेतृत्वालाच ‘असं कसं बा चालेल,’ असा सवाल केला आहे.

संधीसाधू आणि मतलबी आयारामांच्या नादी लागल्याने भाजपचा परंपरागत मतदार दुरावत असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. पक्षात बाहेरून आलेल्या भ्रष्ट, चारित्र्यहिन, तत्त्वमूल्यांशी देणेघेणे नसलेल्यांना रेड कार्पेट घातले जात असल्यानेच दोन पिढ्यांपासून पक्षासाठी स्वयंशिस्त पाळत स्वयंसेवक म्हणून काम करणारा कार्यकर्ता दुरावत जात आहे. हे वेळीच थांबवले नाही तर भाजपची कँडरबेस इमेज धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे मत या ज्येष्ठ आमदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे. या सूत्रांच्या मते कसबा पोटनिवडणुकीत परंपरागत मतदार भाजपपासून दुरावल्याचे स्पष्ट दिसले आहे.

त्यापूर्वीच नागपुरात शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाने संघ प्रणित शिक्षक परिषदेसोबत जात काँग्रेसमधून आयात केलेल्या नागो गाणार यांची हमखास विजयी होणारा उमेदवार म्हणून वर्णी लावली, मात्र संघ शाखा आणि रेशीम बागेच्या तालमीत वाढलेल्या येथील परंपरागत मतदारांनी संदीप जोशी यांच्यानंतर दुसर्‍यांदा भाजपच्या उमेदवाराला नाकारले आहे. विरोधात मतदान करण्याचा हा ट्रेंड भाजपच्या परंपरागत मतदारांनी कल्याण-डोंबिवलीत २०१२ मध्ये दाखवला होता. अगदी तसाच तो अमरावतीमध्ये डॉ. रणजित पाटील यांच्या निवडणुकीत दिसला होता, असे या सूत्रांनी सांगितले.

कसब्यात खासदार गिरीश बापट यांच्या आजारपणातही पक्षाकडून त्यांना देण्यात आलेली वागणूक आणि टिळक कुटुंबीयाआधी २०१९ मध्ये कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांना गृहित धरून त्यांच्या राजकीय प्रवासावर केलेले आक्रमण पारंपारिक मतदार असलेल्या भाजपच्या मतदारांना रूचलेले नाही. अश्विनी जगताप यांना वेगळा न्याय आणि टिळक कुटुंबीयांसाठी वेगळा ही बाबदेखील खटकणारी होती, असे या सूत्रांनी सांगितले.

अंधेरी, नागपूर-अमरावती आणि आता कसबा अशी ‘इजा बिजा तिजा’ भाजपसाठी धोक्याची घंटा दाखवून परंपरागत मतदार नेतृत्वाला काय संदेश देत आहेत याकडे वेळीच लक्ष न देता गुजरात पॅटर्नचा अट्टाहास केला तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षात बंडखोरीचा नवा पॅटर्नदेखील पाहायला मिळू शकेल, असे या सूत्रांचे मत आहे.

कसबा पोटनिवडणुकीत मूळ शिवसेनेतून आलेल्या रवींद्र धंगेकर यांचा व्हाया मनसे टू काँग्रेस असा प्रवास असतानाही महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे त्यांचा विजय शक्य झाला, तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या काटे आणि कलाटे या संघर्षाचा फटका तिन्ही पक्षांना बसला. त्यामुळे एकजुटीने राहिल्यास उज्ज्वल भवितव्य आहे, असा संदेश चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला मिळाला आहे, असे या सूत्रांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे धनशक्ती आणि सत्तेचा वापर करीत कसब्यात भाजपच्या १० मंत्री, ३ केंद्रीय मंत्री आणि राज्यभराची पक्ष संघटना यांनी शक्ती पणाला लावल्याचा आरोप होत असतानाही महाविकास आघाडीविरोधात विजय मिळवता आला नाही.

याचा अर्थ नाराज परंपरागत मतदारांना आता कोणतेही आमिष किंवा धाक दाखवून पुन्हा पक्षासोबत आणता येणार नाही. त्यासाठी वाट चुकलेल्या नेतृत्वालाच मूळ विचारधारेसोबत जावे लागेल आणि आयारामांपेक्षा दोन पिढ्यांपासून पक्षासोबत असलेल्यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे, हा संदेश मतदारांनी दिला आहे, अन्यथा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप निष्ठावंत असा सामना किमान शंभर विधानसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळू शकेल, असे भाकीत या ज्येष्ठ नेत्यांनी वर्तविले आहे.

एकनाथ शिंदे भविष्यात भाजपचे मुख्य नेते?
विशेष म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळूनही विधानसभेत बोलताना शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण शिवसेनेचे मुख्य नेते असल्याचा विसर पडल्यासारखे भाजप आता मते आणि मनेदेखील जिंकेल, असे प्रवक्त्याच्या अविर्भावात विरोधकांना सांगितलेले पाहून भविष्यात मुख्यमंत्री शिंदेच महाराष्ट्र भाजपचेही मुख्य नेते असतील की काय, अशी शंकाही या निष्ठावंतांनी व्यक्त केली आहे.