छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे दोन मागण्या केल्या आहेत.जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जे ठरलेलं आहे त्यानुसार लिखित टाईमबॉन्ड द्यावा आणि कुणबी नोंदी शोधण्याचं काम जे सुरू झालं आहे ते अधिक वेगाने राज्यभरासह मराठवाड्यात वाढवावं, असं जरांगे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी ओबीसीतूनच आरक्षण मिळावं या मागणीवर आपण ठाम असल्याचं सांगितलं. (The government should do the job of reservation fast give reservation only from OBC Manoj Jarange Patil insisted on the demand)
ओबीसीतून आरक्षण दिलं तर ते फारसं देता येणार नाही, त्यात मराठा समाजाचं नुकसान आहे, असं फडणवीसांनी म्हटलं होतं त्यावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसीतून आरक्षण दिलं तर ते कोणाचंच कमी होणार नाही तसंच आम्हालाही कमी मिळणार नाही. आमचा लढा यशस्वी होईल, असं जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षण हे ओबीसीमधूनच पाहिजे
50 टक्क्यांवरचं आरक्षण वाढवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या, असं भूजबळ म्हणाले होते यावर जरांगे पाटील म्हणाले की, 70 नाहीतर 80 टक्के आरक्षण वाढवा, पण आम्हाला आरक्षण हे ओबीसीमधून द्या. आम्हाला गाजर दाखवू नका. आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला द्यावं, असं जरांगे म्हणाले.
मनुष्यबळ वाढवावं- जरांगे पाटील
कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी सरकारकडून लावण्यात आलेलं मनुष्यबळ हे काही ठिकाणी अपूरं आहे. त्यामुळे नोंदी शोधण्यास विलंब होत आहे. त्यामळे सरकारला विनंती आहे की त्यांनी मनुष्यबळ वाढवून नोंदी शोधाव्यात जेणेकरून 24 डिसेंबरपर्यंत कुणबी असल्याचं दाखले मिळतील आणि आरक्षण देता येईल.
15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्राचा दौरा
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आता महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरूवात होणार आहे. राज्यातील सर्व मराठा एकजूट व्हावा यासाठी हा दौरा केला जाणार आहे. हा दौरा 15 ते 23 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.
विदर्भ, तसंच मराठवाडा आणि कोकण अशा टप्प्यांमध्ये पुढचा दौराही केला जाणार आहे. तसंच, यावेळी त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे की, कोणीही आरक्षणासाठी आत्महत्या करु नये.
(हेही वाचा: कार्तिकी एकादशीची पूजा अजित पवारांच्या हस्ते? मराठा क्रांती मोर्चाचा तीव्र विरोध )