घरठाणेमनपा अधिकारी कर्मचारी महासंघाचे उपोषण

मनपा अधिकारी कर्मचारी महासंघाचे उपोषण

Subscribe

सरकारच्या आकृतीबंधामध्ये अन्याय झाल्याचा आरोप

भिवंडी महानगरपालिका अधिकारी, कर्मचार्‍यांवर सेवा प्रवेश नियमावली (आकृतीबंध) मध्ये अन्याय केला आहे. तसेच 2005 नंतर कामावर रुजू झालेल्या कर्मचार्‍यांची फसवणूक करुन त्यांचे भविष्य अंधारात लोटले आहे. हे दोन्ही विषय अतिशय गंभीर असून कर्मचार्‍यांचे आयुष्य उध्वस्त करणारे आहे. या प्रकरणी नवीन आकृतिबंधात त्रुटी दूर करून त्यामध्ये तात्काळ सुधारणा करावी तसेच कर्मचार्‍यांवर अन्याय करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी लेखी मागणी पालिका आयुक्तांकडे करीत भिवंडी मनपा कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी-कर्मचारी यांनी सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी पालिका मुख्यालयाच्या गेट जवळ इशारा उपोषण पुकारले आहे. या कृती समितीमध्ये म्युनिसिपल मजदूर युनियन, अखिल महाराष्ट्र ज.का.युनियन, म.रा.कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड, शासकीय वाहन चालक, भिवंडी विभाग या युनियनचा सहभाग आहे.

तब्बल 12 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कर्मचार्‍यांच्या सेवा प्रवेश नियमावलीला (आकृतीबंध) नुकतीच शासनाने मंजुरी दिलेली आहे. वर्षानुवर्षे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या भवितव्याचा प्रश्न यामुळे मिटणार होता. मात्र, इतक्या प्रतिक्षेनंतरही काही निवडक, स्वार्थी पालिका अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे चुकीच्या पध्दतीने आपले सहकारी आणि आर्थिक देवाणघेवाण केलेल्यांचे हित जोपासत सेवा प्रवेश नियमावली, आकृतीबंध शासनाकडून मंजूर करुन आणले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थानिक कर्मचार्‍यांना (लिपिक, आरोग्य निरीक्षक वगैरे) डावलून त्यांना पदोन्नतीसाठी वंचित ठेऊन सरळसेवेने भरती करण्याचा कुटिल डाव काही अधिकार्‍यांनी आखला आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेच्या आस्थापना खर्चाचा ताळमेळ न बसविता वर्ग 1, वर्ग 2 ची पदे ज्याचे दरमहा वेतन लाखाच्या घरात आहेत अशा पदांना मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सफाई कामगार, रोड कामगार, मुकादम, ड्रायव्हर यांचा विचार न करता खाजगीकरणाच्या दिशेने पाऊल उचलले असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे या सेवा प्रवेश नियमावलीला (आकृतीबंध) स्थगिती देऊन भिवंडी मनपात असलेल्या विविध विभागानुसारच सेवा प्रवेश नियमावली, आकृतीबंध तयार करण्यात यावे अशी मागणी भिवंडी मनपा कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीची आहे.

सध्या काम करीत असलेल्या सफाई कामगार, रोड कामगार, मुकादम, ड्रायव्हर यांचा विचारच करण्यात आलेला नाही. शहराच्या लोकसंख्येच्या मानाने सफाई कामगारांची संख्या अगदीच तुटपुंजी आहे. त्यामुळे सफाई कामगारांवर अतोनात ताण येत आहे. त्यामुळे सफाईच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत आहे. याचा विपरित परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. तरीही या चतुर्थश्रेणीच्या पदांचा विचार न करता मलाईदार असलेली वर्ग1 आणि वर्ग 2 च्या पदांचाच जास्तच विचार केला गेला आहे. एकूणच हे आकृतीबंध काही अधिकार्‍यांनी आपल्या सोयीच्या दृष्टीने तयार केले असुन भिवंडी मनपामध्ये असलेल्या विविध विभागानुसार आकृतीबंध तयार केल्यास न्यायोचित होईल असे कामगार-कर्मचारी युनियनच्या पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. या संघर्ष कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी पालिकेच्या आणि अधिकारी, कर्मचार्‍यांच्या सोयीचे सर्वसमावेशक आकृतीबंध तयार केले असून त्यानुसार अथवा विभागानुसार मंजुरी मिळावी अशी मागणी राज्याचे प्रधान सचिव, भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले, भिवंडी पुर्वचे आमदार रईस शेख आणि भिवंडी मनपाचे आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -