घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रउत्सवातील दांभिकतेला डोळस भक्तीची गरज

उत्सवातील दांभिकतेला डोळस भक्तीची गरज

Subscribe

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।
निर्वीघ्नम कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

वक्राकार सोंड असलेल्या विशाल, प्रचंड शरीर धारण करणार्‍या कोट्यवधी सूर्याच्या प्रकाशाएवढ्या बुद्धिमत्ता असलेल्या हे गणपती बाप्पा माझे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडू देत! असे म्हणणारे आपण मनुष्य प्राणी विघ्नहर्त्यालाच विघ्नदाता बनवतो आहोत असे नाही का वाटत आपणांस?

- Advertisement -

गणपती बाप्पाच्या आगमनाची लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच आतुरतेने वाट पाहतात. समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सुखाचे, प्रगतीचे, आस्थेचे, हर्षोल्हासाचे, सात्विकतेचे प्रतीक वाटत असते. बाप्पाच्या निमित्ताने घरात भरपूर गोष्टींची उलाढाल होते, प्रत्येकास कामाची संधी मिळते. घराची साफसफाई होते, लहान मुले जी “पुष्पा, झुकेगा नहीं साला” यात व्यस्त होती ती सर्वच मुले आरत्या, श्लोक, स्तोत्र अशा गोष्टी आनंदाने पाठ करू लागतात. तर असा हा प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा बाप्पा. याची आवड म्हणजे भौतिक सुख सुविधा, भव्य सजावटी की साधारण भक्ती भाव हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

एकंदरीतच जागतिकीकरण, खासगीकरण यामुळे मनुष्याचे राहणीमान उंचावले आहे. चंगळवादी संस्कृतीने सातत्यपूर्ण व चिरकाल टिकणार्‍या अशा संकल्पनांना तडा देत तात्पुरते टिकणारे, कामचलाऊ या संकल्पनांना जन्म दिला व त्या मनामनांत घरही करू लागल्या. मग अशाच माणसांनी आपल्यासोबतच आपल्या सणांच्यादेखील पद्धती बदलविल्या. जी गणपतीची पूजा कधीकाळी एका सुपारीने सुरू होऊन त्याच सुपारीवर संपत होती ती आता भव्यदिव्य अशा देखाव्यांवर सुरू होते आणि तितक्याच भव्यतेवर जाऊन संपते. बाप्पाच्या नावाखाली वा त्याच्या सजावटीच्या नावाखाली गल्ली, दुकाने प्लास्टिकच्या माळा, तोरणे, प्लास्टिकचे लॉन्स, प्लास्टिकचे दिवे या झगमगाटात झाकून गेले. माणसाने स्वतःची हौस, स्वतःचा खोटा थाट, मिजाज आणि समाजातील खोटे स्थान मिळवण्याच्या धडपडीत गणपतीलाही याच स्पर्धेत खेचले. गणपतीला चांदीचे ताट, चांदीचे मोदक, चांदीची फुलं लागत नाही. त्याला प्लास्टिकचे खोटे मंदिर, थर्माकोलची सजावटदेखील नको असते.

- Advertisement -

भक्तीचा, श्रद्धेचा चुकीचा वापर करून चुकीचा समज निर्माण करून संस्कृतीचा, धर्माचा अर्थ बदलला जातोय असे नाही का वाटत आपणास? प्लास्टिकचे तोरणे, हार, प्लास्टिकचे गवत यांचा जो खच अख्ख्या बाजारात ओसंडून वाहतो; तो प्रदूषण रुपी नावाच्या राक्षसास आमंत्रण देतो आणि विघ्नहर्त्या गणपतीला विघ्नदाता बनवितो. आपण आपल्या चुकीच्या वागण्यामुळे, पद्धतीमुळे देवास बदनाम करतो; मग काही शास्त्रीयदृष्ट्या विचार करणार्‍या वा नास्तिक व्यक्तींना धर्म, धार्मिक कल्पना यावर भाष्य व तेही चुकीचे भाष्य करण्यास संधी मिळते. हे जसे कृत्रिम वस्तूंचे एक उदाहरण आपल्यासमोर आहे तसेच माणसाने काही नैसर्गिक गोष्टीसुद्धा या स्पर्धेत घेतल्या आहेत. त्यातले एक म्हणजे गणपतीच्या पूजेसाठी लागणारी 21 पत्री. या पत्रींच्या नावाखाली नको त्या वनस्पतींचे बाजारीकरण होते व आपण सर्व डोळस माणसे आंधळे होऊन ते व्यवहार करतोय.

बाजारात येणार्‍या पत्रींमध्ये दोन वनस्पती अतिप्रमाणात विकल्या जातात की, ज्यामुळे त्या वनस्पतींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. एक म्हणजे शिळंद, रानहळद आणि दुसरी म्हणजे अग्निशिखा, कळलावी या दोन्ही वनस्पती गणपतीच्या पूजेसाठी लागत नाहीत पण देवाच्या नावाखाली एकाच पाटीत 200 ते 300 या फुलांच्या जोड्या सापडतात. या वनस्पती अतिपावसाच्या जंगल भागात आढळून येतात. तसेच त्या इंडेमिक टू वेस्टर्न घाट म्हणजे जगाच्या पाठीवर फक्त सह्याद्रीच्या जंगलात सापडतात. अशा या महत्त्वपूर्ण वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्त वनस्पतींच्या अतितोडीनंतर त्या आता नष्ट होणार्‍या प्रजातींच्या लाल यादीत समाविष्ट झाल्या आहेत याचा परिणाम जैवविविधतेवर, परिसंस्थेवर हानिकारक होतोय. अशी दुर्मिळ फुले गौरी गणपतीला वाहून माणसे निसर्गाचा नाश करीत आहेत. भक्ती भावाच्या भुकेल्या देवाला दांभिकतेची जोड देऊन नवीन पिढीला चुकीच्या संस्कृतीचे धडे शिकवणारे आपण विघ्नहर्ता गणपती बाप्पाला विघ्नदाता, पोल्युशन क्रिएटर बनवतो आहोत. शरीराचे, मनाचे, बुद्धीचे डोळे उघडून बघण्याची व समजून घेण्याची नितांत गरज आज आपणा सगळ्यांसमोर आली आहे.

श्रुती देशमुख 

(लेखिका होरायझन अकॅडमी, सीबीएसई, नाशिकच्या मुख्याध्यापिका आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -