अखेर त्या चार इमारतींच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला

bmc iqbal singh chahal order send legal notice to Mumbai University for refusal to keep mud

मुंबई विद्यापीठातील नवीन परीक्षा व प्रशासकीय भवन, ग्रंथालय इमारत, मुलींचे वसतिगृह आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह या चारही इमारतींना जूनमध्येच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (ओसी) मिळाला होता, मात्र राज्यात अचानक सुरू झालेल्या सत्तांतराच्या नाट्यामुळे पुढे ढकललेल्या उद्घाटन कार्यक्रमाला अखेर मुहूर्त मिळाला. या चारही इमारतींचे ८ जुलैला सकाळी ११ वाजता राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

कलिना परिसरात उभारलेल्या ३८ इमारतींना ओसी मिळावी यासाठी युवासेना व विद्यार्थी संघटनांकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. युवासेनेकडून तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सामंत यांनी विद्यार्थी, कर्मचारी यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मुंबई महापालिका, अग्निशमन दल व मुंबई विद्यापीठ प्रशासनातील अधिकार्‍यांची एकत्रित बैठक घेऊन हा मुद्दा तडीस लावण्यासाठी प्रयत्न केले.

तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि युवासेना यांच्या प्रयत्नांना यश येऊन मुंबई विद्यापीठातील नवीन परीक्षा व प्रशासकीय भवन, ग्रंथालय इमारत, १४४ विद्यार्थी क्षमतेचे मुलींचे वसतिगृह आणि १४६ विद्यार्थी क्षमतेचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह यांना जूनमध्ये ओसी मिळाली, मात्र त्याचदरम्यान राज्यामध्ये सत्तांतरनाट्य सुरू झाल्याने या चारही इमारतींचा उद्घाटन सोहळा लांबणीवर पडला. यासंदर्भात ‘आपलं महानगर’ने २३ जूनला ‘मुंबई विद्यापीठाच्या इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती.

महाराष्ट्रात सुरू असलेले सत्तानाट्य संपल्यानंतर अखेर मुंबई विद्यापीठातील या चारही इमारतींचे उद्घाटन ८ जुलैला राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर व प्र. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी उपस्थित राहणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या विद्यानगरी येथील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात होणार आहे.

नेहरू ग्रंथालयातील पुस्तकांना मिळणार हक्काचे स्थान
ज्ञानस्रोत केंद्र म्हणून नवीन ग्रंथालय इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यामुळे नेहरू ग्रंथालयामध्ये वाळवी लागलेल्या व धूळखात असलेल्या लाखो पुस्तकांना हक्काचे स्थान मिळणार आहे. त्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या पुस्तकांचे जतन होण्यास मदत होणार आहे. नेहरू ग्रंथालयातील पुस्तकांच्या दुरवस्थेबाबत युवासेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी वारंवार कुलगुरू व विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले होते. ही इमारत तळमजल्यासह दोन मजली बांधण्यात आली आहे. पर्यावरणपूरक खेळती हवा असणारी अशी ही इकोफ्रेंडली इमारत आहे. हे ग्रंथालय भविष्यात डिजिटल ग्रंथालय म्हणून ओळखले जाईल.