उद्योग-गावं पळवली, सरकार देवधर्म, तंत्र-मंत्र, ज्योतिषीमध्ये अडकले; संजय राऊतांचा घणाघात

महाराष्ट्रासाठी लढणारी शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. सरकार बसलं असलं तरीही शिवसेना उभी आहे, असा घणाघातही संजय राऊतांनी यावेळी केला.

मुंबई – कर्नाटक सरकारने (Karnatak Government) महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर (Jat District) दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnatak Border Conflict) पुन्हा एकदा उफाळून येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुका कर्नाटकात समाविष्ट करण्याचे सूतोवाच केलेत. यावरून महाराष्ट्रात बराच हलकल्लोळ माजला आहे. याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सरकारचे प्रमुख देवधर्म, तंत्र-मंत्र, ज्योतिष यामध्ये अडकल्यामुळे कर्नाटकातून आणि अन्य राज्यातून महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत. कोणी उद्योग पळवतायत, कोणी जमिनी, गावं पळवतायत, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – मोठी बातमी! महाराष्ट्रातल्या जत तालुक्यावर कर्नाटकाचा दावा

राज्याचे उद्योग आणि गावं, तालुके दुसऱ्या राज्यात जात असताना यावर ठाम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उभे राहिले नाहीत. एकही गाव जाणार नाही असं बोलून चालत नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला आहे. आम्हाला आणि सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. आतापर्यंत कर्नाटकच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याची अशी हिंमत झाली नव्हती. कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत आणि तुम्हीही भाजपा राज्यकर्ते आहात. मला वाटतंय तुमचं आता संगनमत चाललं आहे की गुजरातने उद्योग पळवायचे आणि कर्नाटकने गावं, तालुके, जिल्हे पळवायची आणि सह्याद्री खतम करायचा, असा आरोपही संजय राऊतांनी केला.

ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ले करायचे आणि आमचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं याचे षडयंत्र रचलं जातंय का याची भीती वाटतेय. सरकार दुर्बल असेल महाराष्ट्रात, पण शिवसेना महाराष्ट्रावर आलेलं प्रत्येक संकट परतवून लावेल. आम्हाला तुरुंगाची आणि रक्त सांडण्याची भिती नाही. महाराष्ट्रासाठी लढणारी शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. सरकार बसलं असलं तरीही शिवसेना उभी आहे, असा घणाघातही संजय राऊतांनी यावेळी केला.