विलेपार्लेतील नाल्यालगत ४५० झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; मंगळवारी होणार बैठक

विलेपार्ले जुहू रोड, इंदिरा नगर येथील मोठ्या नाल्यालगतची जमीन रविवारी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात खचल्याने ७ झोपड्यांची पडझड झाली होती. तर त्या नाल्यालगतच्या परिसरातील ४०० - ४५० झोपड्यांना धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेचे पूर्व संकेत रविवारी दुपारीच मिळाल्याने भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता मेहता व त्यांचे पती राजेश मेहता यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या सहकार्याने वेळीच तेथील अनेक झोपडीधारकांचे नजीकच्या पालिका शाळेत स्थलांतर केल्याने कोणीही जखमी झाले नाही व मोठी जीवित हानी टळली.

मुंबई : विलेपार्ले जुहू रोड, इंदिरा नगर येथील मोठ्या नाल्यालगतची जमीन रविवारी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात खचल्याने ७ झोपड्यांची पडझड झाली होती. तर त्या नाल्यालगतच्या परिसरातील ४०० – ४५० झोपड्यांना धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेचे पूर्व संकेत रविवारी दुपारीच मिळाल्याने भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता मेहता व त्यांचे पती राजेश मेहता यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या सहकार्याने वेळीच तेथील अनेक झोपडीधारकांचे नजीकच्या पालिका शाळेत स्थलांतर केल्याने कोणीही जखमी झाले नाही व मोठी जीवित हानी टळली. मात्र आता येथील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंगळवारी पालिका अधिकऱ्यांसोबत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामध्ये झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत योग्य तो निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (The issue of rehabilitation of 450 huts along the drain in Vile Parle is on the air The meeting will be held on Tuesday)

दरम्यान, पालिकेच्या के/पश्चिम विभाग कार्यलयामार्फत इंदिरा नगर १ मधील नाल्यालगतच्या धोकादायक झोपड्या हटविण्याचे काम रात्रीपासून करण्यात आले. तर २५ झोपडीधारक व २ दुकानदार यांना तात्काळ नजीकच्या सन्यास आश्रम पालिका शाळेत तात्पुरता स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था पालिका व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

इंदिरा नगर १ येथे रविवारी रात्री ८.०० वाजताच्या सुमारास जमीन खचल्याने ७ घरांचना तडे जाऊन काही घरांची पडझड झाल्याची घटना घडल्यानंतर उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजपचे आमदार पराग आळवणी, आमदार अमित साटम यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी, सदर ठिकाणी वसलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत के/ पश्चिम विभाग सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मुंबई महापालिकेकडे प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक पर्यायी घरे ( प्रकल्प बाधितांसाठी सदनिका – पीएपी) उपलब्ध नसल्याने विलेपार्ले इंदिरा नगरमधील नाल्यालगतच्या अंदाजे ४०० – ४५० झोपडीधारकांना पर्यायी घरे देण्यात अडचण निर्माण झाली आहे.

मात्र झोपडीधारकांची त्याच जागेत पुनर्वसन करण्यात यावे, अशी जोरदार मागणी आहे. त्यामुळे आता महापालिका व स्थानिक खासदार, आमदार, माजी नगरसेवक व विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी कामाला लागले आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी व योग्य तो निर्णय घेण्यासाठी पालिकेच्या के/ पश्चिम विभाग कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. कारण की, एवढ्या मोठया प्रमाणात झोपडीधारक असून त्यांना सदर सुरक्षिततेच्या कारणास्तव त्या धोकादायक जागेवरून हटवून पालिकेच्या शाळेत किती दिवस ठेवणार, त्यांना किती दिवस जेवण व इयर सुविधा पुरविणार असे प्रश्नही उभे ठाकले आहेत. त्यावर काहीतरी समाधानकारक मार्ग काढण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करीत आहे.

वास्तविक, महाविकास आघाडीची सत्ता असतानाच इंदिरा नगर १ आणि २ मधील सदर जागेवरील झोपडीधारकांना बिल्डरच्या माध्यमातून बिल्डिंग उभारून पक्की घरे देण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र ही सर्व प्रक्रिया सुरू असतानाच राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला व महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि सत्ता गेली. त्यामुळे इंदिरा नगरमधील झोपडीधारकांना पक्की घरे देण्याची प्रक्रिया रखडल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. आता मंगळवारी झोपडीधारक व पालिका प्रशासन यांच्यात होणाऱ्या बैठकीत कोणत समाधानकारक निर्णय होतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


हेही वाचा – तुरुंगातून सुटून भोंदूबाबा लागला पैशांचा पाऊस पाडण्याच्या तयारीला, पोलिसांनी केले गजाआड