घरमहाराष्ट्रगणेश मूर्तींचे रंगकाम शेवटच्या टप्प्यात !

गणेश मूर्तींचे रंगकाम शेवटच्या टप्प्यात !

Subscribe

गणेशोत्सव तोंडावर आल्याने गणेश मूर्ती बनविणार्‍या कारखान्यांमध्ये लगबग सुरू असून, मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात कारागीर मग्न आहेत. याशिवाय तयार झालेल्या गणेशमूर्ती विक्रीसाठी इतरत्र पाठवण्याचे कामही वेगाने सुरू आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. महाराष्ट्रचा सांस्कृतिक सण म्हणून याकडे पाहिले जाते. उत्सवात अर्धा फुटापासून ते १० फुटापर्यंतच्या मूर्ती पहावयास मिळतात. यापैकी बहुतांश मूर्ती तयार झाल्या असून उर्वरित मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. जास्तीत जास्त आकर्षक गणेश मूर्ती तयार करण्याकडे कारागिरांचा कल असल्याने कारखान्यांतून टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता अनुभवयास मिळत आहे. तालुक्यात आठ दिवसांपासून पावसाने बर्‍यापैकी विश्रांती घेतल्यामुळे गणपती कारखानदारांना दिलासा मिळाला असून, मूर्तींवरील रंगकाम सुकण्यासही मदत होत आहे.

शहरासह तालुक्यात सुमारे १५० गणपती कारखानदार असून, सर्वच कारखानदार गणपतीचे काम अंतिम टप्प्याकडे नेण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहेत. पाऊस थांबल्यामुळे वीज जाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळेही कारखानदार समाधानी आहेत. तालुक्यात सार्वजनिक गणपतीची प्रथा नसून प्रत्येक घरात स्वतंत्र गणपती आणण्याची परंपरा आहे. रेवदंडा व मुरुड पोलीस ठाणे हद्दीत सुमारे दहा हजारांच्यावर गणपतींचे आगमन होत असते.

- Advertisement -

विशेष म्हणजे तालुक्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या जात नाहीत. त्यामुळे येथे खर्‍या अर्थाने पर्यावरणाचे संवर्धन केले जात आहे. यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत पाच टक्के वाढ झाली आहे. तरीसुद्धा दरवर्षी प्रमाणेच उत्साह दिसून येत आहे.

शाडूच्या मूर्तींना विशेष मागणी
इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणांहून शाडूच्या मूर्तींना मागणी आहे. शाडूच्या मूर्तींच्या किमतीमध्ये झालेली वाढ, तसेच हाताळण्यास नाजूक असल्याने मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांकडून मात्र अजूनही प्लास्टर आफ पॅरिसच्या मूर्तींनाच मागणी असल्याची माहिती मूर्तीकारांनी दिली. तर चलत्चित्रासाठी विविध धार्मिक, सामाजिक देखाव्यावर आधारित शाडूच्या मूर्तींची मागणी आहे.

- Advertisement -

पेण तालुक्यातील गडब येथील जर्नादन पाटील, शांताराम पाटील यांच्या गणपतीच्या कारखान्यातील शाडूच्या मूर्तींना विशेष मागणी असून, भक्तांच्या मागणीनुसार मूर्ती बनविल्या जात आहेत. सध्या पाटील कुटुंबियांची तिसरी पिढी या व्यवसायात. नितिन पाटील, आकिन पाटील, सत्यम पाटील, सुंदरम पाटील, अंलकार पाटील, श्रीयोग पाटील यांनी हा व्यवसाय पुढे सुरू ठेवला आहे.

मूर्तीकारांची लगबग
गणरायाच्या आगमनासाठी जेमतेम बारा दिवसांचा कालावधी उरलेला असताना मूर्ती तयार करण्यात येणार्‍या कारखान्यांतून कारागिरांची लगबग सुरू आहे. भक्तांच्या मागणीनुसार मूर्तींना रंग देण्यात येत असून, अंतिम कामासाठी मूर्तीकार अक्षरशः तहानभूक विसरून काम करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. पारंपरिक मूर्तींना ज्याप्रकारे मागणी आहे त्या प्रमाणाने नवीन प्रकारच्या मूर्तींनाही असते, असे मूर्तीकार रोहन पाटील यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -