शिवसंग्राम पक्षाचे नेतृत्त्व आता डॉ.ज्योती मेटे यांच्याकडे? कार्यकर्त्यांनी केली मागणी

jyoti mete

मराठा आंदोलनाचे नेते, शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झाल्याने कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विनायक मेटे यांनी अनेक समाजहिताची कामे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षाचं नेतृत्त्व कोण करणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. दरम्यान या संदर्भात शिवसंग्रामच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत शिवसंग्रामच्या नेतृत्त्वाची जबाबदारी विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे यांच्याकडे देण्याचा ठराव झाला आहे.

हेही वाचा – विनायक मेटे अपघात प्रकरणाची होणार सीआयडी चौकशी, मुख्यमंत्र्यांचे आदेश

विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर, त्यांनी शिवसंग्राम पक्षाची स्थापना केली. विनायक मेटे यांनी महायुतीलाही पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपाने त्यांना विधानपरिषदेवर पाठवले. नुकतीच त्यांनी विधानपरिषदेवरील सदस्यत्वाची मुदत संपली. दरम्यान, ते पुन्हा विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता होती. मात्र, त्यांचं निधन झाल्याने आता ज्योती मेटे यांनी विधानपरिषदेवर जावं अशी मागणी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

हेही वाचा – विनायक मेटेंच्या चालकाचा मोठा खुलासा, ‘त्या’ रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी

दरम्यान, मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.