Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बहारच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल; वर्धा शहरपक्षी निवडणूक लिम्का बुकमध्ये

बहारच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल; वर्धा शहरपक्षी निवडणूक लिम्का बुकमध्ये

Subscribe

वर्धा येथील पक्ष्यांच्या निवडणुकीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून तसे प्रमाणपत्र बहार नेचर फाऊंडेशनला नुकतेच प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्रात दुसरी तर विदर्भात पहिलीच ठरलेली आणि सर्वदूर गाजलेली वर्धा येथील पक्ष्यांच्या निवडणुकीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून तसे प्रमाणपत्र बहार नेचर फाऊंडेशनला नुकतेच प्राप्त झाले आहे. बहार आणि वर्धा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २०१८ मध्ये वर्धा शहरपक्षी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. पक्षी आणि त्याअनुषंगाने पर्यावरणविषयक जाणीव जागृती करणाऱ्या या निवडणुकीचा प्रचार आणि मतदान तब्बल ५४ दिवस चालले. या निवडणुकीत एकूण ५१ हजार ९२३ नागरिकांनी शहरपक्ष्याकरिता मतदान केले होते. त्यातून २२,९१५ असे विक्रमी मताधिक्‍य प्राप्त झालेला भारतीय नीलपंख  वर्धानगरीचा शहरपक्षी निवडून आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल घेत पूर्णतः नाविन्यपूर्ण  नोंद म्हणून निसर्ग आणि पर्यावरण या विभागातून  लिम्का बुक ऑफ रेकॉर्डद्वारे नोंद करण्यात आली.

WhatsApp Image 2020-03-13 at 14.07.02
पक्ष्यांच्या निवडणुकीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली

- Advertisement -

२३ जून ते १५ ऑगस्ट २०१८ या दरम्यान नागरिकांमध्ये प्रचार यंत्रणा राबवित धीवर म्हणजेच किंगफिशर, कापशी घार, ठिपकेवाला पिंगळा, तांबट आणि नीलपंख या पाच पक्ष्यांबाबत जनमताचा कौल घेण्यात आला होता. हा उपक्रम केवळ मतदानापुरता मर्यादित न ठेवता बहार नेचर फाउंडेशनने या काळात विविध माध्यमांद्वारे परिसरातील पक्ष्यांबाबत जनजागृती करीत छायाचित्र प्रदर्शनी, चित्रफितीद्वारे सादरीकरण, दर रविवारी पक्षिनिरीक्षण यासोबतच चला उमेदवारांना भेटू या, मगन संग्रहालयाच्या भिंतीवर पाखरांची शाळा, माझा पक्षी माझे चित्र स्पर्धा, सायकल प्रचारयात्रा, उमेदवार एका मंचावर असे अनेक अभिनव उपक्रम राबविले होते. स्थानिक रहिवाशांसोबतच देशविदेशात स्थायिक झालेल्या वर्धेकरांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद देत ऑनलाईन पद्धतीने मतदान केले होते. २२ ऑगस्ट २०१८ रोजी प्रख्यात पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली तसेच शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या पाच फेऱ्यांनंतर सर्वाधिक मते प्राप्त केलेल्या भारतीय नीलपंखला वर्धा शहरपक्षी म्हणून घोषित करण्यात आले होते. या निवडणुकीचे सर्व प्रकारचे दस्तावैज बहार नेचर फाऊंडेशनद्वारे ऑक्टोबर २०१८ मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सकडे पाठवून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याची दखल घेत या आगळ्यावेगळ्या निवडणुकीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डद्वारे अखेर नोंद करण्यात आली.

शहरपक्षी नीलपंखचा पुतळा लवकरच वर्धानगरीच्या प्रवेशद्वारावर होणार विराजमान

या अभियानात बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, उपाध्यक्ष आर्की. रवींद्र पाटील, सचिव दिलीप वीरखडे, सहसचिव राहुल तेलरांधे, संजय इंगळे तिगावकर, डॉ. बाबाजी घेवडे, जयंत सबाने, दीपक गुढेकर, वैभव देशमुख, डॉ. जयंत वाघ, स्नेहल कुबडे, डॉ. सुप्रिया व पराग दांडगे, अविनाश भोळे, मोहम्मद जलील, राहुल वकारे, मैथिली मुळे, प्रा. ज्योती तिमांडे, विनोद साळवे, राजेंद्र लांबट, नितीन ठाकरे, नितीन हादवे, डॉ. विभा गुप्ता, प्रा. अतुल शर्मा, डॉ. गोपाल पालीवाल, डॉ. तारक काटे, मुरलीधर बेलखोडे, सुनंदा वानखडे, आशीष पोहाणे, नितीन गिरी, डॉ. आरती प्रांजळे, पंकज घुसे, अनघा लांबट, दर्शन दुधाने, पार्थ वीरखडे, संगीता इंगळे, प्राजक्ता वीरखडे, मेघा गुढेकर, तारका वानखडे, राजदीप राठोड, बुद्धदास मिरगे, प्रा. नितीन ठाकरे, प्रा. पद्माकर बाविस्कर, प्रवीण कलाल, मैथिली मुळे, जान्हवी हिंगमिरे, संहिता इथापे यांच्यासह अनेक पक्षीमित्र व पर्यावरणप्रेमी या उपक्रमात सक्रियरित्या सहभागी होते. या अनोख्या निवडणुकीने नीलपंखच्या विजयासोबतच वर्धेकरांच्या पक्षीप्रेमी व पर्यावरणस्नेही असण्यावरही शिक्कामोर्तब केले. विजेता शहरपक्षी नीलपंखचा पुतळा आकाराला येत असून तो लवकरच वर्धानगरीच्या प्रवेशद्वारावर विराजमान होणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -