भारताने घेतला स्वच्छ मोकळ्या हवेचा श्वास!

लॉकडाऊनमुळे 20 वर्षांचे प्रदूषण झाले साफ

करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असला तरी संपूर्ण देश मात्र प्रदूषणमुक्त झाला आहे. सर्व नद्यांचे पाणी स्वच्छ, पारदर्शक होत असून हरिद्वारमधील गंगेचे पाणी देखील पिण्यायोग्य झाले आहे. याचाच अर्थ लॉकडाऊनमुळे सगळेच थांबलेले असताना देश मात्र सध्या प्रदूषणविरहीत स्वच्छ हवेचा श्वास घेत आहे, असे अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने म्हटले आहे. तशी छायाचित्रे त्यांनी पाठवली आहेत.

नासाने गेल्या चार वर्षांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत, ज्यामध्ये संपूर्ण भारतात प्रदूषण पातळी कशाप्रकारे खाली आली आहे हे दाखवण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे घराबाहेर वाहने घेऊन फिरणार्‍यांची संख्या अगदीच कमी झाली आहे. कारखाने, कंपन्या बंद असून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वाहने रस्त्यावर दिसत आहेत. या लॉकडाऊनमुळे करोनाचा संसर्ग रोखण्यात मदत होत असून वातावरणातही त्याचा चांगला सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. नासाने असे म्हटले आहे की, लॉकडाऊनदरम्यान देशातील प्रदूषण कमी झाले असून हवेत असणारे प्रदूषित धूलीकण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

नासाने हे फोटो मॉडरेट रिझोल्यूशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडिओमीटर (MODIS) टेरा उपग्रहातून घेतले आहेत. लॉकडाऊनमुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने खाली येऊन भारतातील प्रदूषणाची समस्या कमी झाल्याचे नासाने म्हटले आहे. त्याविषयीची उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध करून त्याच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब केले आहे. भारतात 25 मार्चपासून लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे भारतातील 130 कोटी लोक आपल्या घरीच राहत आहेत.

याशिवाय कोणता पर्याय असू शकत नाही
गंगेच्या काठी वसलेला देशाचा भाग पूर्णपणे स्वच्छ झाला आहे. गंगेच्या किनार्‍यावर वसलेल्या शहरात असणारे प्रदूषण कमी झाले आहे. 20 वर्षांहून अधिक काळ दिसणारे प्रदूषित आभाळ लॉकडाऊनमुळे स्वच्छ दिसू लागले आहे. भारतातील प्रदूषित हवा स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम मार्ग याशिवाय दुसरा कोणता असू शकत नाही. केवळ हवाच नाही तर जमीन आणि पाणीही सर्व स्वच्छ झाले आहे. हवामान स्वच्छ रहावे यासाठी भारताने नेहमीच असे प्रयत्न केले पाहिजेत. जेणे करून हवामान शुद्ध राहण्यास कायम मदत होईल, असे नासाच्या मोडिस एरोसोल प्रोडक्टचे प्रोग्राम लीडर रॉबर्ट लेवी यांनी सांगितले.