जालना येथे मराठा आंदोलकांवर 1 सप्टेंबर, शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जालन्यातील अंतरावली सराटी इथे हा प्रकार घडला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथे आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या उपोषणाचा शुक्रवारी चौथा दिवस होता, त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात काही आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाज आक्रमक झाला. आता या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अनेक जिल्ह्यांत आंदोलनं केली जात आहेत. तसंच, या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत.
जालन्यात झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा समाजाने मुंबईतील, दादरमध्ये आंदोलन केले. तसंच, मुंबई, पुणे ,बुलढाणा तर सोलापूरमध्ये देखील मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं. (The Maratha community protested in Dadar Mumbai Plaza Pune Buldhana Solapur Nashik)
दादरमध्ये मराठा समाज आक्रमक
मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा मुंबईच्या दादरमधील प्लाझा समोरील रस्त्यावर आक्रमक झाला आहे. या ठिकाणी मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. राज्यातील शिंदे सरकारविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याविरोधातही आंदोलक आक्रमक झाले आहेत. तसंच, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. यासोबतच मराठा आरक्षणासंदर्भात जाबही विचारला जात आहे. मराठ्यांवरील अन्याय कधीपर्यंत संपणार? असा प्रश्न उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. दादरमध्ये मराठा समाजाच्या महिलांनी उपस्थित पोलिसांना राख्या बांधल्या.
काही ठिकाणी बंदची हाक, तर काही शहरात आंदोलन
जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या प्रकरणी राज्यभर पडसदा उमटले आहेत. नाशिकमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. तर सोलापूरमधील सकल मराठा समाजाने जिल्ह्याभरात रास्ता रोको आंदोलन जाहीर केलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जालनात बसेस बंद
जालना बसस्थानकात आज देखील शुकशूकाट आहे. लाठीचार्जच्या निषेधार्थ रविवारी एकही बस सोडणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण मराठवाड्यात बस सेवा आजही बंद ठेवण्यात आली आहे. तसंच, राज्यातील इतर भागातूनह मराठवाड्याकडे येणाऱ्या बसेस आजही बंद आहेत.
सोलापुरात आंदोलन
सोलापूर सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्ह्याभरात रास्ता रोको आंदोलन केलं गेलं. सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी जालन्यातील लाठीचार्जचा निषेध करण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यात आंदोलन
बुलढाणा जिल्ह्यात मेहकर येथे मराठा समाजाकडून धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि जालना येथील आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे.
धुळे शहरात आंदोलन
धुळे शहरात मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शहरातील मुख्य चौक शिवतीर्थ येथे रास्ता रोकोचं आयोजन केलं होतं. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने कराची वाला खुंट येथे हे आंदोलन केलं.
नाशिक बंदची हाक
मराठा क्रांती मोर्चाकडून आज नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे. जालना येथील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ नाशिक बंदची हाक दिली आहे. नाशिकच्या सीबीएस परिसरात असलेल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलनाला सुरूवात झाली.
(हेही वाचा: “इंडिया आघाडीवरून लक्ष विचलित करण्यासाठी लाठीमाराचे आदेश”, संजय राऊतांना संशय )