घरमहाराष्ट्रएसएससी बोर्डाचा चमत्कार, शाळेला केले ऑलआऊट

एसएससी बोर्डाचा चमत्कार, शाळेला केले ऑलआऊट

Subscribe

एसएससी बोर्डाचा प्रताप
नायगावच्या गिरीजा म्हात्रे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नापास करून या शाळेचा शून्य टक्के निकाल घोषीत करण्याचा प्रताप एसएससी बोर्डाने केला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापनाला मोठा धक्का बसला आहे.
वसईतील अनेक शाळांनी एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकाल दिल्यामुळे आनंदोत्सव साजरा केला. मात्र, नायगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील जूचंद्र गावातील गिरीजा म्हात्रे या शाळेचा निकाल शून्य टक्के लागल्याचे इंटरनेटवर जाहीर झाले. त्यामुळे निकाल पाहणारे शाळेचे शिक्षक, व्यवस्थापकीय मंडळ, पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. या शाळेचे ४१ विद्यार्थी शालांत परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी नापास झाल्याचे बोर्डाच्या साईटवर दाखवण्यात आले होते. त्यामुळे शाळेने शिक्षकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांनाच दोषी ठरवले. मात्र, हा दोष शिक्षक किंवा विद्यार्थ्यांचा नसून एसएससी बोर्डाचा असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे गावात संतापाची लाट पसरली.

८२ टक्के मिळवलेला मुलगाही नापास
८२ टक्के गुण मिळवलेला विद्यार्थी नापास आणि चांगल्या गुणांनी पास झालेले इतर विद्यार्थ्यांना प्रमोट करून एटीकेटी लावण्याचा प्रताप बोर्डाने केला होता. एका मोठ्या तांत्रिक चुकीमुळे हा घोळ झाल्याचे त्यानंतर निदर्शनास आले. शाळेत न शिकवला जाणारा व्ही-१ हा विषय विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटावर छापून आला होता. त्यावेळी शाळेने हा विषय शिकवला जात नाही असे बोर्डाला कळवून हॉलतिकीटाच्या दुरुस्तीसाठी पैसेही भरले होते. तरीही बोर्डाच्या ढिसाळ कारभारामुळे ही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्याचा फटका विद्यार्थ्यांना पुढे निकालात बसला. शाळेने ताबडतोब बोर्डाशी संपर्क साधला असता त्यांनी ही चूक झाल्याचे मान्य केले. मात्र, तोपर्यंत सर्वांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहान करावा लागला. शाळेची नालस्ती झाली, अशी प्रतिक्रिया शाळेचे संस्थापक जनार्दन म्हात्रे यांनी दिली. तर नापास झाल्याचे समजल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असती तर त्याची जबाबदारी बोर्डाने घेतली असती का? असा संतप्त सवाल जुगनू म्हात्रे यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -