Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मुंबईत 36.80 टक्के नालेसफाई झाल्याचा महापालिकेचा दावा

मुंबईत 36.80 टक्के नालेसफाई झाल्याचा महापालिकेचा दावा

Subscribe

मुंबई : महापालिकेकडून सध्या शहर व उपनगरे भागात नालेसफाई, रस्ते दुरुस्ती व पुलांची कामे जोमाने सुरू आहेत. आतापर्यंत शहर व उपनगरे येथे मिळून 36.80 टक्के नालेसफाईची कामे केली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पश्चिम उपनगरातील नालेसफाई, रस्ते व पुलांची दुरुस्ती कामे आदींची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, पावसाचे आगमन होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यात यावी. आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामुग्री तैनात करावी. ही कामे होत असताना सर्वसामान्य नागरिकांना अडचणी होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी दिल्या आहेत. यावेळी उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते) एम. एम. पटेल, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विभास आचरेकर उपस्थित होते.

- Advertisement -

पश्चिम उपनगरातील, आर/उत्तर विभागात दहिसर नदी पूल, रुस्तमजी रस्ता, आर/मध्य विभागात राजेंद्र नगर पूल, सुमेर नगर रस्ता, लिंक रोडवरील राजेंद्र नगर नाला, आर दक्षिण विभागात लिंक रोड व एम. जी. रोड जंक्शन, लालजी पाडा पोईसर नदी पूल, त्याचप्रमाणे पी/उत्तर विभागात रामचंद्र नाला, पी/दक्षिण विभागात राममंदीर मार्गावर वालभट नदी येथे पी. वेलरासू यांनी संबंधित अधिकाऱ्यांचसह भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. तसेच, के/पश्चिम विभागात ओशिवरा नदी, लिंक रोड, मोगरा नाला, लल्लूभाई पार्क मार्ग याठिकाणीही दौरा करण्यात आला. पावसाळापूर्व कामे वेळेत करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

- Advertisement -

मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील मोठे नाले, द्रुतगती महामार्ग आणि मिठी नदी याठिकाणी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून नाल्यातून गाळ काढण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. यंदा या सर्व कामांची सुरुवात मार्च 2023पासून करण्यात आली आहे. छोट्या नाल्यातून गाळ काढण्याची कामे विभागीय स्तरावर सुरू आहेत. पावसाळापूर्व गाळ उपसण्याचे 36.80 टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मुंबई शहरात 46.32 टक्के, पूर्व उपनगरात 56.49 टक्के, पश्चिम उपनगरात 44.61 टक्के, मिठी नदीच्या ठिकाणी 26.70 टक्के, द्रुतगती महामार्गावर 19.21 टक्के तर विभागीय स्तरावर छोट्या नाल्याच्या ठिकाणी 33.36 टक्के इतकी कामे पूर्ण झाली आहेत. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामामध्ये आतापर्यंत 3,54,304.58 मेट्रिक टन इतका गाळ काढण्यात आला आहे. पावसाळापूर्व नाल्यातून गाळ काढण्याची कामे दिनांक 31 मे पूर्वी 100 टक्के पूर्ण करण्याचे आदेश पी. वेलरासू यांनी दिले आहेत.

- Advertisment -