घरताज्या घडामोडीउंच झाडावरून पडल्यानंतर छातीत लोखंडी सळई घुसली; पालिका डॉक्टरांनी वाचवला जीव

उंच झाडावरून पडल्यानंतर छातीत लोखंडी सळई घुसली; पालिका डॉक्टरांनी वाचवला जीव

Subscribe

मुंबई : वांद्रे येथे एका उंच झाडावरून तोल गेल्याने खाली कुंपणावर कोसळलेल्या एका कामगाराच्या छातीमध्ये तीक्ष्ण लोखंडी सळई घुसली व तो गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेत त्याच्या छातीची एक बरगडीही तुटली.एवढ्या गंभीर जखमी अवस्थेतील कामगारावर पालिकेच्या वांद्रे, भाभा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी वेळीच वैद्यकीय उपचार केल्याने सदर कामगाराला जीवनदान लाभले आहे.

वास्तविक, ही दुर्घटना नुकतीच घडली असून ‘त्या’ कामगाराला नव्याने जीवनदान लाभले आहे. तर आतापर्यंत असे घटनाप्रकार व यशस्वी उपचार जास्त करून खासगी व नामांकित रुग्णालयांबाबत घडत असत. मात्र आता मुंबई महापालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालयात घडल्याने त्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. संबंधित डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

वांद्रे परिसरात मजुरी काम करणारा एक २२ वर्षीय तरुण कामगार काही कारणास्तव एका उंच झाडावर चढला होता. मात्र त्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेतली नव्हती. त्यामुळे अचानकपणे झाडावरून त्याचा तोल गेला आणि तो झाडावरून खाली एका संरक्षक भिंतीवर पडला. या भिंतीवर लावण्यात आलेली लोखंडी तीक्ष्ण बाणासारखी सळई सदर कामगाराच्या छातीत घुसली. त्यामुळे त्या कामगाराच्या छातीची एक बरगडीही तुटली आणि ती सळईही तुटली. ती सळई त्या कामगाराच्या छातीत रुतून बसली व तो गंभीर जखमी झाला.

त्याला सथनिकांनी तात्काळ गंभीर जखमी अवस्थेत वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले, अशी माहिती महापालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.

- Advertisement -

रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांनी, तात्काळ त्याच्यावर आवश्यक ते उपचार व शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्या जखमी कामगारवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याची क्ष-किरण तपासणी करण्यात आली. त्यात त्या जखमी कामगाराच्या छातीजवळ घुसलेली तीक्ष्ण सळई सुदैवाने फुप्फुसांपर्यंत पोहोचली नसल्याचे व त्यामुळे फुप्फुसांना इजा झाली नसल्याचे निदर्शनास आले.

मात्र त्याची एक बरगडी तुटली होती आणि रक्तस्राव होत असल्याने या कामगाराची प्रकृती गंभीर होती. भूलतज्ञ डॉ. वरुण नाईक आणि डॉ. सोनाली कागडे यांनी कौशल्यपूर्वक रुग्णाला भूल दिली आणि त्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. शल्यचिकित्सा विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनोद खाडे, डॉ. अमीत देसाई, डॉ. श्रद्धा भोने तसेच परिचारिका मानसी सरवणकर, श्रीमती रेश्मा पाटील यांच्या पथकाने सुमारे तासभर शस्त्रक्रिया करून सळई यशस्वीपणे बाहेर तर काढलीच सोबत या कामगाराला धोक्याच्या अवस्थेतून देखील बाहेर काढले. अपघात घडल्यानंतर या रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने सुदैवाने रक्तपुरवठा करण्याची गरज भासली नाही.

तथापि, कामगाराच्या शरीरातील सळई बाहेर काढल्यानंतर खोलवर असलेल्या जखमेमुळे फुप्फुसांजवळ आणि हृदयाजवळ अंतर्गत रक्तस्राव जमा होऊ नये तसेच हवा भरली तर ती बाहेर काढता यावी यासाठी नळी टाकण्यात आली. अतिशय कठीण अशी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर या रुग्णास संपूर्ण एक दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. उपचारास चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर या रुग्णास सर्वसाधारण कक्षात स्थलांतरित करण्यात आले. तसेच सुमारे आठवडाभराच्या वैद्यकीय उपचारानंतर आणि योग्य आहार दिल्यानंतर प्रकृती सुधारल्याने हा रुग्ण आता घरी परतला असून त्यास दोन ते तीन आठवडे पूर्णतः विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पाटील यांनी दिली आहे.


हेही वाचा : महिलांच्या भालाफेक स्पर्धेत देशाला कांस्यपदक, अन्नू राणीची उत्कृष्ट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -