प्रेयसीसोबतच्या भांडणात मध्यस्थी; तरुणाचा चाकूने भोकसून खून

शिवाजीवाडी, मुंबई नाका येथील घटना; तीन सख्ख्या चुलत भावांना अटक

भांडणात मध्यस्थी केल्याची कारणातून म्हसरूळमध्ये टोळक्याने तरुणाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच मुंबई नाका परिसरात प्रेयसीसोबतच्या भांडणात करणार्‍या मित्राला तीन सख्ख्या चुलत भावांनी चाकूने भोकसून खून केल्याची घटना शनिवारी (दि.२८) रात्री ११ वाजता शिवाजी वाडी, मुंबई नाका येथे घडली. पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. सागर प्रकाश रावतर (वय २०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर भारत भोये, गणेश भोये, गौतम भोये अशी अटक करण्यात आलेल्या संशितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर रावसर व संकेत कोरडे हे बालपणीचे मित्र आहेत. संकेत कोरडे याचे भोये यांच्या घरातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या कारणावरुन शनिवारी (दि.२९) कोरडे आणि भोये कुटुंबात वाद झाला. त्यावेळी सागरने संकेतला समजावून सांगत तू भांडण करू नको, पोलीस ठाण्यात तक्रार दे, असे सांगितले. त्याचा भोये कुटुंबियांना राग आला. संकेत पोलीस ठाण्यात तक्रार देवून आल्यानंतर संशितांनी सागरला मारहाण केली. त्यातील एकाने सागरच्या छातीत चाकू भोकसला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी (दि.२९) पहाटे त्याचा मृत्यू झाला.

घटनेचे गांभीर्य ओळखत विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे सुटीवर असल्याने बी. जी. शेखर यांच्याकडे पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार आहे. पोलिसांनी संशयित तिघांना अटक केली. याप्रकरणी प्रकाश रावतर यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रर दाखल केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.

नाशकात १५ दिवसांत ६ खून

नाशिक शहरात खूनाचे सत्र सुरु आहे. शिवाय, चोरी, लूटमार, फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ कारणातून तरुणाई थेट जीवघेणा हल्ला करत असल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. शहरात १५ दिवसांत ६ खून झाले आहेत. या खुनाच्या घटनांमुळे नाशिक हादरले आहे. १६ मे रोजी रात्री ११.३० वाजता स्वयंपाक येत नसल्याच्या कारणातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना आडगावमध्ये घडली. १८ मे रोजी पंचवटीत हट्टी स्वभाव व शिवीगाळील कंटाळून बापाने मुलाचा खून केला. १८ मे रोजी रात्री ९ वाजेदरम्यान म्हसरूळमध्ये भांडण सोडवणार्‍या तरुणाचा टोळक्याने खून केला. १९ मे रोजी मैत्री कमी केल्याच्या कारणातून वकील व पोलीसपुत्रांनी तरुणाचा खून केला. २० मे रोजी पहाटे ४.३० वाजता कट मारल्याने नशेखोर टोळक्याने प्रवाशाचा खून केला. २८ मे रोजी रात्री भांडणात मध्यस्थी झाल्याने तिघांनी तरुणाचा खून केला.