‘त्या’ खुनाचा उलघडा झाला, दारूसाठी पैसे मगितल्याने डोक्यात दगड घालून खून

नाशिक : मखमलाबाद लिंक रोडवरील समर्थ नगर जवळील मोकळ्या जागेत आढळलेल्या मृत तरुणाची ओळख पटविण्यासह खूनाचा उलगडा करण्यात पंचवटी पोलिसांना यश आले. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने दुचाकीवर लिप्ट दिलेल्या तरुणानेच दोघांशी वाद घातला. त्यातून दुचाकीवरील दोन अल्पवयीन मुलांनी तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. ऋषिकेश उर्फ कुशल दिनकर भालेराव (वय १९, रा.धर्माजी कॉलनी, शिवाजी नगर, सातपूर, नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शरदचंद्र पवार मार्केट ते मखमलाबाद रोड लिंकरोडवरील पाटालगत, हमालवाडी, पंचवटी येथे शनिवारी (दि.२१) सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर गुन्हयातील अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यास व त्यास जिवे ठार मारणारे अज्ञात आरोपींचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिसांना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पथकांमार्फत नाशिक शहरातील पंचवटी, सातपूर, गंगापूर, हिरावाडी, म्हसरूळ, गंगाघाट, सरकारवाडा परीसर पिंजून काढण्यात आला. पोलिसांना मृताची ओळख पटवण्यात यश आले. मृत तरुण ऋषिकेश उर्फ कुशल दिनकर भालेराव असल्याचे निष्पन्न केले.

गुन्हयातील मयताची ओळख पटल्यानंतरही त्याचे मारेकर्‍यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी पथकातील अंमलदारांसह दोन दिवस गुन्ह्याचा तपास केला. पोलिसांना तपासात दोन विधीसंघर्षित बालकांनी ऋषिकेशचा खून केल्याचे निष्पन्न केले. पोलिसांना दोघांना तपासकामी ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत दोघांनी ऋषिकेशचा खून केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज पत्की करीत आहेत.

ऋषिकेशला लिफ्ट देणे पडले महागात

 दोन विधीसंघर्षित बालक शुक्रवारी (दि.२०) रात्री त्यांचे मित्राला सोडण्यासाठी दुचाकीने सातपूरला गेले. मित्राला सोडल्याने ते पंचवटीकडे येत असताना रात्री ११.४५ वाजता सातपूर परीसरात ऋषिकेशने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. मला हमालवाडी पाटाजवळ सोडा, असे त्याने सांगितले. त्याप्रमाणे दोघांनी त्यास लिफ्ट देवून रात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्यास शरदचंद्र पवार मार्केट ते मखमलाबाद रोड लिंकरोड वरील पाटालगत सोडले. त्यावेळी मद्यधुंद ऋषिकेशने दोघांकडे दारूसाठी पैसे मागितले. त्यावेळी दोघांनी आम्ही तुला लिफ्ट दिली आणि पुन्हा दारूसाठी आमच्याकडे पैसे मागतो, असे सांगितले. राग अनावर झाल्याने ऋषिकेशने त्यांना शिवीगाळ करून त्यातील एकाची गच्ची पकडली. त्यातून तिघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात दोघांनी ऋषिकेशला लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर दगडाने ठेचून त्यास ठार केले.