घरमहाराष्ट्रहत्येच्या १२ वर्षानंतर लागला आरोपीचा शोध

हत्येच्या १२ वर्षानंतर लागला आरोपीचा शोध

Subscribe

बारा वर्षांपूर्वीच्या एका खून प्रकरणातील आरोपीला त्याच्या मूळ गावातून अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश आलं आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील विष्णूनगर येथील शैलैंद्रसिंह दानसिंह शेखावत (२७) या इसमाची बारा वर्षांपूर्वी हत्या झाली होती. या गुन्ह्यातील आरोपी फरार झाला होता.

गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि सहकारी याप्रकरणाचा तपास करीत होते. संबंधित आरोपी मध्यप्रदेशमधील भिंड या मूळ गावी असल्याची माहिती त्यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक भिंड गावात गेले. चंबळच्या खोऱ्याच्या बाजूला असलेला हा प्रदेश गुन्हेगारी कारवायांसाठी कुप्रसिद्ध आहे. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने १५ दिवसात त्यांनी राजकुमार राजावत (६२) या आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणातील नरेंद्रसिंग राजावत आणि पिटुसिंग राजावत आणि ऋषी डॅग हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

- Advertisement -

आरोपी राजकुमार राजावत यांने दिलेल्या माहितीनुसार शैलैंद्र सिंह शेखावत यांनी परदेशात नोकरी लावण्यासाठी चौघांकडून पैसे घेतले होते. बराचकाळ लोटूनही नोकरी लागत नसल्याने त्यांनी त्याच्याकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला. मात्र तो पैसेही परत करीत नव्हता. त्या रागाने त्यांनी संगनमताने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह शालीत गुंडाळून नाल्यात फेकून दिला. याप्रकरणी २१ मार्च २००७  मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील अन्य आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -