मुंबई : महायुतीच्या नव्या सरकारमधील सत्तावाटप निश्चित करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक तर झाली. पण या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले. मुख्यमंत्री भाजपचाच होईल. मात्र तो कोण असेल, याबाबत अमित शहा यांनी कोणतेही सूतोवाच बैठकीत केले नसल्याची माहिती भाजप सूत्रांनी शनिवारी दिली. त्यामुळे नवीन मुख्यमंत्री कोण होईल, याबाबात राजकीय वर्तुळात गूढ वाढले असून भाजपचे धक्कातंत्र लक्षात घेता शेवटच्या क्षणी चर्चेत नसलेले नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (the name of the new chief minister is not known; fadnavis supporters upset, will Shinde be displeased?)
नवी दिल्लीतील बैठकीनंतर शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या गावी निघून गेले. सत्तावाटपात भाजपकडून योग्य सन्मान राखला जात नसल्याने शिंदे नाराज असल्याचे बोलले जाते. या नाराजीमुळे महायुतीचे पुढील चर्चेचे घोडे अडले आहे. अशातच भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक लांबणीवर पडल्याने मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाणारे देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अमावस्येमुळे गेले दोन दिवस महायुतीच्या पातळीवर सामसूम आहे. त्यामुळे महायुतीकडून सरकार स्थापनेबाबत पुढील आठवड्यात हालचाली अपेक्षित आहेत.
हेही वाचा – Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, मुंबईहून डॉक्टरांची टीम दरे गावात दाखल
विधानसभा निवडणुकीचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. या निवडणुकीत महायुतीला 232 जागा मिळाल्या आहेत. 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालीच महायुतीचे सरकार स्थापन होईल, हे आता स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यानंतर महायुतीत सत्तावाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली. भाजपचे शीर्षस्थ अमित शहा हेच महायुतीच्या सरकारमधील शिंदे आणि अजित पवार गटाचा सहभाग, मंत्र्यांची संख्या, खाते निश्चित करणार आहेत. महायुतीत गृह, नगरविकास, वित्त आणि नियोजन, महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम अशा महत्वाच्या खात्यांवरून रस्सीखेच सुरू आहे. शिंदे यांना गृह खाते आणि या खात्याचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हवे आहेत. मात्र, भाजप गृह खाते सोडायला तयार नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाजपला नगरविकास खाते स्वतःकडे ठेवायचे आहे. अजित पवार वित्त आणि नियोजन खात्यासाठी आग्रही असले तरी भाजप नेतृत्व त्यासाठी फारसे अनुकूल नाही. त्यामुळे इतर खात्यांबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुंबईत एकत्र बसून निर्णय घ्यावा. या निर्णयाची माहिती दिल्लीला द्यावी, अशी सूचना अमित शहा यांनी केल्याचे समजते. मात्र, शिंदे मुंबई बाहेर गेल्याने अशी बैठक होऊ शकलेली नाही.
भाजपसमोर अनेक पर्याय?
विधानसभेतील मोठा पक्ष आणि छोटे पक्ष तसेच अपक्ष आमदारांनी देऊ केलेल्या पाठिंब्यामुळे एकटा भाजप साध्या बहुमताच्या जवळपास पोहचला आहे. त्यामुळे मित्र पक्षावर फार विसंबून राहण्याची भाजपला आवश्यकता नाही. विधानसभेतील संख्याबळ भाजपसाठी सर्वस्वी अनुकूल असल्याने भाजप महाराष्ट्रात मध्य प्रदेश, राजस्थान सारखा प्रयोग करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मराठा चेहरा म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, चंद्रकांत पाटील तर ओबीसी चेहरा म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे, भागवत कराड, डॉ. अजित गोपछडे यांची नावे नेतृत्वाच्या चर्चेत आहेत. अर्थात भाजपकडून मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होत नाही तोपर्यंत या यादीत आणखी काही नावांची भर पडू शकते.
हेही वाचा – Politics : …म्हणून बाबा आढावांच्या भेटीला जिंकलेले आणि हरलेले सुद्धा येतायत; ठाकरेंनी सांगितलं कारण
विधिमंडळ बैठकीकडे लक्ष
विधानसभेवर निवडून आलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक नेमकी कधी होणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. कारण बैठकीची तारीख एकदा ठरली की दिल्लीतून निरीक्षक पाठवले जातील. हे निरीक्षक मुंबईत येऊन पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केलेल्या नावाची घोषणा करतील. भाजपमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. फडणवीस यांचीच मुख्यमंत्री म्हणून निवड होईल, हा ठाम विश्वास असल्याने भाजपचे आमदार,पदाधिकारी, कार्यकर्ते यांची ‘सागर’ बंगल्यावर त्यांना भेटण्यासाठी रिघ लागली आहे. मात्र, दिल्लीतून मुख्यमंत्री निवडीचा उपचार पार पाडण्यास विलंब होत असल्याने खुद्द देवेंद्र फडणवीस यांची देहबोली बदलली आहे. त्यामुळे फडणवीस समर्थक सध्या बुचकळ्यात आहेत.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar