नवजात बाळाचे शरीर निळे पडले, श्वासही अनियमित; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर…

strangulate her newborn baby in civil hospital in sangli

मुंबई – मुंबई महापालिकेची रुग्णालये व तेथील तज्ज्ञ डॉक्टरांमुळे एखाद्या गंभीर आजारपणात, दुर्घटनेत मृत्यूच्या दारात गेलेल्या रुग्णाला, व्यक्तीला तज्ज्ञ डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून जीवदान दिल्याच्या घटना घडत असतात. अशाच एका घटनेत कांदिवली येथील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात गेल्या महिन्यात जन्मतः अत्यंत गंभीर परिस्थिती असलेल्या नवजात बालकावर तज्ज्ञ डॉक्टरांनी परिणामकारक व प्रभावी उपचार केल्याने त्या बाळाला जीवदान मिळाले आहे.

सध्या त्या बाळाची प्रकृती चांगली आहे. त्यामुळे त्याचे कुटुंबीय आनंदित आहेत. डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे बाळ हसू-खेळू लागले. त्याला जीवनदान देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरही आनंदित व समाधानी आहेत. याप्रकरणी मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली येथील महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोपचार रुग्णालयात गेल्या महिन्यात एका महिलेने मुलीला जन्म दिला. जन्मानंतर काही तासातच या नवजात बाळाचे शरीर निळे पडू लागले व बाळाचा श्वासोच्छवास अनियमित झाला. त्यामुळे नवजात बालकाच्या आईला व कुटुंबियांना मोठा धक्काच बसला. ते अतिशय घाबरले होते.

फुल टर्म प्रेग्नन्सी व नॉर्मल डिलिव्हरीनुसार जन्म झालेल्या सदर नवजात बाळाचे जन्मतः वजन ३ किलोग्रॅम नोंदविले होते. बाळाच्या जन्मानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयातील प्रसूती पश्चात वॉर्डच्या रुटीन व्हिजिट दरम्यान बालरोगतज्ज्ञांना नवजात बाळाचे शरीर निळे पडले असल्याचे व तिचा श्वासोच्छवास अनियमित झाल्याचे दिसून आले. त्यांनी सदर अर्भकाला तात्काळ अतिदक्षता विभागात स्थलांतरित करून ‘बबल सीपॅप’ सुरू केले.

मात्र, त्यानंतरही नवजात बाळाचा श्वासोच्छवास नियंत्रित होत नाही, हे लक्षात येताच तिला इनट्युवेटेड व व्हेन्टिलेटेड करण्यात आले. निष्णांत बालरोग व हृदयरोग तज्ज्ञ यांचेदेखील मार्गदर्शन यावेळी घेण्यात आले. त्यानंतर सदर नवजात बाळाचा कृत्रिम श्वासोच्छवास सुरू झाल्यानंतर डॉ.आंबेडकर रुग्णालयातील डी.एन.बी. शिक्षक व निओनॅटोलॉजिस्ट डॉ. मुकुंद शिरोळकर ह्यांनी तिची बेडसाईड इको चाचणी केली. या चाचणीनुसार त्यांनी सदर बाळाला ट्रान्सिएन्ट पल्मोनरी हायपरटेन्शनची शक्यता वर्तविल्यामुळे ‘स्लाईडेनाफिल’ सुरू करण्यात आले.

बाळाच्या सतत निरिक्षणादरम्यान २% पेक्षा जास्त प्रमाण अनियमित मानले जाणाऱ्या मेथॅमोग्लोबिनची पातळी ३०% दरम्यान आढळल्यानंतर तातडीने बाळाची एचबी इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी केली. या चाचणीमध्ये हिमोग्लोबिन एममध्ये अनियमितता आढळली नाही. परंतु, एन्झायम्स ऍनालायसिसमध्ये सदर बाळात एनएडीएच सायक्लोटोम बी फाइव्ह रिडक्टेस डेफिशिएन्सी असल्याचे आढळले. वैद्यकीयदृष्ट्या ही बाब अत्यंत दुर्मिळ असल्याने बाळाची आई व वडिल या दोघांचीही सदर चाचणी केली असता दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल आले.

त्यानंतर, डॉ. आंबेडकर रुग्णालयातील बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने ह्या नवजात बाळाला इंजेक्शन मिथिनिल ब्ल्यूचे उपचार सुरू केले. ज्यायोगे तिची मेथमोग्लोबिनची पातळी २% पेक्षा कमी झाली. त्यानंतर बाळाचे एक्सट्युबेशन केले असता, रूम एअरवर ९८% सॅच्युरेशनसह तिने नियमित श्वासोच्छवास घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर व्हिटॅमिन ‘सी’ व व्हिटॅमिन ‘ई’ ची पूरक मात्रा बाळाला सुरू करण्यात आली. त्यानंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. यानंतर वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक त्या तपासण्या व चाचण्या केल्यानंतर बाळाला अतिदक्षता विभागातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी बाळाची प्रकृती अपेक्षित स्तरापर्यंत सुधारल्यावर बाळाला रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता साधारणपणे महिन्याभरानंतर बाळाची प्रकृती उत्तम असून बाळ हसत-खेळत आहे, असे डॉ. गुप्ता यांनी कळविले आहे.