घरमहाराष्ट्रपुणेथाटात स्वागत कसे करायचे, हे पुणेकरांना ठाऊक आहे; पंतप्रधान मोदींचे मध्य रेल्वेच्या...

थाटात स्वागत कसे करायचे, हे पुणेकरांना ठाऊक आहे; पंतप्रधान मोदींचे मध्य रेल्वेच्या ट्वीटला उत्तर

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, शुक्रवारी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याचे ट्वीट मध्य रेल्वेने केले आहे. थाटात स्वागत कसे करायचे, हे पुणेकरांना ठाऊक आहे, असे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

पंतप्रधान मोदी काल, शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते नवव्या आणि दहाव्या वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा या दोन वंदे भारत ट्रेन आहेत. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना तसेच तीर्थयात्रेसाठी या दोन्ही ट्रेनचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे, असे मोदी यांनी या लोकार्पण सोहळ्यात सांगितले. देशातील 17 राज्यांतील 108 जिल्ह्यांत वंदे भारत ट्रेन कनेक्ट आहेत.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून साईनगर शिर्डीकडे जाणारी वंदे भारत ट्रेन ठाणे रेल्वेस्थानकात येताच भाजपाचे कार्यकर्ते व प्रवाशांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. वंदे मातरम् व मोदी… मोदी… अशा घोषणा देत भाजपा कार्यकर्ते व प्रवाशांनी जल्लोष केला. या वेळी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर उपस्थित होते. या दोन गाड्यांमधील साईनगर शिर्डी एक्सप्रेसला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दादर, ठाणे आणि नाशिक रोड असा थांबा देण्यात आला आहे.

- Advertisement -

तर मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनला कल्याण स्थानकात थांबा दिला आहे. दादर, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी अशी ही गाडी जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी या गाडीला हिरवा कंदिल दाखविल्यानंतर ही गाडी पुणे रेल्वेस्थानकात पोहचताच, तिचे ढोल-ताशांच्या गजरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्याचे व्हिडीओ मध्य रेल्वेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याला ‘पुण्यातील जनतेला थाटात स्वागत कसे करायचे, हे नक्कीच ठाऊक आहे!’ असे उत्तर पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -