नाशिक : समृद्धी महामार्गाच्या कामामुळे नादुरुस्त झालेल्या सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत सिन्नर-इगतपुरी येथील मनसैनिकांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला निवेदन दिले आहे. रस्ते दुरुस्ती तात्काळ न झाल्यास मनसेस्टाईल खळ..खट्याक आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनसैनिकांनी दिला आहे.
विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरण्याच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या व राजधानी मुंबई व राज्याच्या हिवाळी राजधानी नागपूरला जोडणार्या, राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या अश्या आठ पदरी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात पोहचले आहे. जिल्ह्यातील सिन्नर तसेच इगतपुरी ह्या दोन तालुक्यांतून जाणार्या ह्या राज्य महामार्गामुळे नाशिक जिल्हा ह्या महामार्गाला जोडला गेला आहे. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ह्यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या ह्या प्रकल्पाच्या कामात कुठलाच अडथळा येऊ नये ह्यासाठी गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी प्रकल्पाच्या ठेकेदारांना अनेक सूट देण्यात आल्या होत्या.
सरकारी व खासगी जमिनीतून मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून अवजड वाहनांद्वारे हे गौण खनिज महामार्गाच्या भरावासाठी नेण्यात आल्याने सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील जवळपास ६० गावांना जोडणार्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर चाळणी झाली आहे. नियमाप्रमाणे ह्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारांनी करणे रास्त असतांना ’समर्था घरच्या…. दोष नाही’ उक्ती प्रमाणे त्यांनी आपले हात वर करून घेतले असून घाई गडबडीने समृद्धी महामार्गाच्या विविध टप्प्यांचे उदघाटन करून एकमेकांची पाठ थोपटून घेणार्या राज्यातील शासनकर्त्या युतीतील सत्ताधार्यांनी सिन्नर व इगतपुरी ह्या दोन्ही तालुक्यांतील जनतेला ऐन पावसाळ्यात प्रचंड मोठ्या खड्ड्यांतून आपला जीव मुठीत धरून प्रवास करायला लावले आहे.
ह्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जवळपास १५ कोटी निधी लागणार असून ह्या रस्त्यांच्या दुरावस्थेची तपासणी करून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी राज्य रस्ते विकास महामंडळास ह्यासाठी पाठविलेल्या पत्रास अजून उत्तर आलेले नाही. ह्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ह्या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांनी केलेल्या आंदोलनासही सत्ताधार्यांनी भीक घातली नसून सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील जवळपास ६० गावांना जोडणार्या ह्या नादुरुस्त रस्त्यांना तातडीने दुरुस्त करणे गरजेचे असतांना प्राधिकरणाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथे अपघात होऊन जीवित व वित्तीय हानी झाल्यास त्यास प्राधिकरणाचे अधिकारीच जबाबदार राहतील. तरी प्रशासनाने जनतेच्या भावनांची दखल घेऊन तात्काळ ह्या दोन्ही तालुक्यांतील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत अन्यथा याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी अमित गांगुर्डे, विजय आहिरे, धरम गोविंद आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.