कसब्यात पोलिसच पॉलिटिकल एजंट बनून पैसे वाटप करतायत; संजय राऊतांचा आरोप

कसबा पेठ विधानसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने पोलिसांच्या साथीने पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. पण याबाबत आता ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते यांनी धंगेकरांच्या या आरोपाला दुजोरा दिला आहे. कसब्यात पोलिसच पॉलिटिकल एजंट बनून पैसे वाटप करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी सुद्धा केला आहे.

the police act as political agents and distribute money; Sanjay Raut's allegation
संग्रहित छायाचित्र

कसबा पेठ पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराच्यानंतर भाजपकडून पोलिसांच्या मदतीने पाई वाटप करण्यात येत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात धंगेकर आज उपोषण करणार आहेत. याबाबत ठाकरे गटाचें खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटप करणे हा एका फॉर्मुला तयार करण्यात आला आहे. मागच्या निवडणुकीत सुद्धा पुणे, बारामती या भागात पोलिसांच्या गाडीमधून कशा प्रकारे पैसे वाटप करण्यात येत होते, हे पुराव्यासकट उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसच पॉलिटिकल एजंट बनून पैसे वाटप करण्यात येतात, हे पुराव्यासकट याआधी देखील उघड झाले असल्याचे राऊत यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सुरक्षितपणे पैसे वाटप करण्याचे काम कोण करू शकत? पोलिसांच्या गाड्यांमधून पैशांची देवाण-घेवाण अत्यंत सुरक्षितपणे करण्यात येते. हे पाच वर्षांपूर्वी अनेकांनी पुराव्यासह सिद्ध केले आहे. त्यामुळे कसब्याचे उमेदवार धंगेकर यांनी केलेला आरोप हा खरा असणार कारण तशी माहिती त्यांच्याकडे आहे.

फडणवीस हे कितीकाळ उपमुख्यमंत्री राहतील हे सांगता येत नाही
यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. फडणवीस हे कितीकाळ उपमुख्यमंत्री राहतील हे सांगता येत नाही कारण ही सगळी दिल्लीची मर्जी आहे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर टीका केली. फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय झाली आहे. पूर्वीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यांच्यामध्ये खूप फरक आहे. त्यांना स्टंट करण्याचा छंद जडला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, पण ते आज उपमुख्यमंत्री आहेत, असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.

देशभरातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
शुक्रवारी (ता. २४ फेब्रुवारी) सायंकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणावर चर्चा केली. याबाबतची पुढील भूमिका लवकरच स्पष्ट केली जाईल. केजरीवाल हे लढवय्ये नेते आहेत, त्यांना सुद्धा राज्यपाल आणि केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याची माहिती राऊत यांनी दिली. तर २०२४ च्या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात करण्यात आली असल्याचे देखील राऊत यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – कसबा पेठ पोटनिवडणुकीत होतेय पैसेवाटप; रवींद्र धंगेकरांचे आज उपोषण

दरम्यान, छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव या नावांचा प्रस्ताव उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी केंद्राकडे पाठवला होता. तर २५ वर्षांपूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांनी या नावाची घोषणा केली होती. त्यामुळे आता हे कागदोपत्री झाल्याने याचे क्रेडिट कोण कशाला घेतंय? असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला.