घरदेश-विदेशजगलो तर रामाचे दर्शन घेऊ - थोरात

जगलो तर रामाचे दर्शन घेऊ – थोरात

Subscribe

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांवरून राजकारणाने ओलांडल्या मर्यादेच्या सीमा, ठाकरेंना आमंत्रणाची गरज नाही - राऊत, पवारांचे वक्तव्य रामचंद्रांच्याविरोधात - भारती

मर्यादा पुरुषोत्तम म्हणून पूजनीय असणार्‍या प्रभू श्री रामांच्या मंदिराचे राजकारण करताना राजकीय पक्षांनी मात्र सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर बांधल्यामुळे कोरोना जाणार आहे का, असा सवाल रविवारी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राम मंदिरामुळे कोरोना जाणार नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी कोरोना जाऊ दे म्हणून साकडे का घातले, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. सोमवारी या वादात काँग्रेसने उडी घेतली. आपण जगलो तरच रामाचे दर्शन घ्यायला जाऊ, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. तर अयोध्येला जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना कोणत्याही आमंत्रणाची गरज नसल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तर भाजप नेत्या उमा भारती यांनी शरद पवार यांचे ते वक्तव्य प्रभू रामचंद्रांच्याविरोधात असल्याची टीका केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. थोरात म्हणाले की, श्रीराम दैवत आहे; पण रामाचे दर्शन घ्यायला आपण जगले पाहिजे. आपण जगलो तरच रामाचे दर्शन घ्यायला जाऊ. त्यामुळे केंद्र सरकारने आता माणसे जगवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मात्र, केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरून दुर्लक्ष करण्यासाठी हा राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे थोरात म्हणाले. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही याविषयी सूचक वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबतच्या प्रश्नावर बोलताना थोरात म्हणाले, तो त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

आमंत्रणाची गरज नाही -राऊत
या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेले आहे, कोरोनाची लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने, अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, कोरोनाची लढाई ही पांढर्‍या कपड्यातील आमचे डॉक्टर आहेत ज्यांना आम्ही देवदूत म्हणतो, ते लढतायेत, धर्मावर आणि देवावर श्रद्धा कायम असते, या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेले आहे आणि ही लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे अयोध्येला नेहमीच जातात, मुख्यमंत्री झाल्यानंतरही गेले, नसतानाही गेले, शिवसेना आणि अयोध्येचे नाते आहे, राजकारणासाठी आम्ही अयोध्येला कधीच गेलो नाही, राम मंदिराचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे, मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे शिवसेनेने दूर केले, ते राजकारण म्हणून नाही तर श्रद्धा आणि हिंदुत्व याच भावनेने आम्ही केले, ते नातं कायम आहे असं स्पष्ट शब्दात शिवसेना नेते संजय राऊतांनी भूमिका मांडली आहे. तर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरली असेल, तर कोणाकोणाला निमंत्रणं पाठवली जातात, त्यामुळे राजकीय सोशल डिस्टन्सिंग किती पाळतात बघावे लागेल, असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

- Advertisement -

उमा भारतींची टीका
भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती यांनी या वक्तव्याचा संदर्भ घेऊन शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार यांनी केलेले वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणारे नाही तर थेट प्रभू रामचंद्रांना विरोध करणारे आहे. आम्ही हा विचार करतो आहोत की कोरोना दूर कसा निघून जाईल. अशात काही लोकांना वाटते की मंदिर बांधल्याने कोरोना जाईल. हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणारे नाही तर प्रभू रामचंद्रांना विरोध करणारे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -