कृषीमंत्रीपद गेले पण, दादांनी ‘पालकमंत्री’ पद मिळवले

नाशिक : शिंदेफडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात वरचे स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या दादा भुसेंनी नाशिकचे पालकमंत्रीपद मिळवण्यात बाजी मारली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्यात नाशिकसाठी रस्सीखेच सुरु असताना भुसेंची झालेली सरशी ही शिंदे गटातील संभाव्य फूट टाळण्यासाठी महत्वाची चाल समजली जाते. दादा भुसे यांच्या निमित्ताने शिंदे गटाला बुस्ट मिळणार असला तरी जिल्ह्यात पाच आमदार असूनही एकही मंत्री नाही. त्यात पालकमंत्रीपदही हातचेे गेल्याने भाजप नेत्यांच्या मनातील सल वाढली नसेल तरच नवल!

जिल्ह्यातील 15 आमदारांमध्ये भाजपचे पाच तर, शिवसेनेचे दोन आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात दादा भुसेंना कृषीमंत्रीपद मिळाले. इतके महत्वाचे खाते स्वत:कडे असताना त्यांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे भुसेंना नवीन सरकारमध्ये पहिल्या रांगेतील मंत्रीपद मिळेल, अशी जिल्हावासियांना अपेक्षा होतीच. सत्तेसोबत मंत्रीपदाची समिकरणेही आणि सवंगडीही बदलले. त्यामुळे भाजप व शिवसेना शिंदे गटातील इच्छुकांची योग्य सांगड घालत मंत्रिपदाचे वाटप होईल, असे जणू सर्वांनी गृहित धरले होते. यात शिंदे गटातील आमदारांना झुकते माप मिळेल, अशी अपेक्षाही कुणी केली नसेल. अगोदरच मुख्यमंत्रीपद बहाल केल्यामुळे आता मंत्रिपदावर भाजपची मोहोर उमटेल, अशीच सर्वांची धारणा होती. पण शिंदे गटाने यातही बाजी मारली. दादा भुसेंना तुलनेने कमी महत्वाचे खाते देऊन त्यांचे महत्व जिल्ह्यात कमी करण्याचा भाजपचा पहिला डाव यशस्वी झाला. पण पालकमंत्रीपद वाटपात नाशिक जिल्ह्याचा तिढा काही केल्या सुटत नसल्याचे दिसून आले.

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित बैठक घेवून हा तिढा सोडवला. गिरीश महाजन यांचा रस्ता बदलून दादा भुसेंकडे नाशिकचा कारभार सोपवला आहे. यातील पहिली शक्यता म्हणजे मंत्रिपद वाटपात दादा भुसेंवर एकप्रकारे अन्यायच झाला होता. आता जर पालकमंत्रीपद दिले नाही तर ते कदाचित बाहेर पडण्याची भिती शिंदे गटाला होती. कुठल्याही परिस्थितीत गटात फूट पडणार नाही, याची काळजी सध्या मुख्यमंत्री शिंदे घेत आहेत. त्यामुळे भुसेंनी केलेली मागणी मान्य करण्यात आली, असाही अंदाज वर्तवला जातो. राहिला प्रश्न गिरीश महाजन यांचा तर महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून भाजपची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. भविष्यात या गोष्टींचे उत्तर द्यायचे झाले तर निवडणूक निकालातून आपला करिष्मा दाखवून देऊ, असाही विचार महाजन यांनी केलेला दिसतो. याचा अर्थ भाजप नाशिक महापालिकेत स्वतंत्रपणे लढण्याच्या विचारात आहे, असेच म्हणता येईल. आपण दुसरी बाजू बघितली तर शिंदे गटाला नाशिक व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. हा ‘बॅकलॉग’ भरुन काढण्यासाठी भुसेंना आता रिंगणात उतरवलेले दिसते. जिल्ह्यात शिवसेना वाढवायची आणि कुठल्याही परिस्थितीत मूळ शिवसेनेला खिंडार पाडायचे, असाच हेतू त्यांच्या नेतृत्वाचा दिसतो. यात भुसे कितपत यशस्वी होतील आणि शिंदे गटाचा किती विस्तार करतील, याची उत्तरे आपल्याला भविष्यातील निवडणुकांनंतरच मिळतील.

जिल्ह्याचे नियोजन तत्काळ व्हावे

शिंदे-फडणवीस सरकारने विकास कामांना ब्रेक लावला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 450 कोटी रुपयांची कामे थांबली आहेत. कामांचे नियोजन अजूनही झालेले नसल्यामुळे त्यांना तत्काळ मंजूरी देवून मार्चअखेरच्या आत ही कामे कशी होतील, यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांना तत्काळ निर्णय घ्यावे लागतील.