नववर्षाच्या स्वागतासाठी भायखळ्यातून निघणार शोभायात्रा, ‘असा’ असेल मार्ग

Gudhipadwa 2023 | या दिवशी गुढीला खास पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो. गुढीपाडव्याला संपूर्ण राज्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन घडते.

gudhipadwa
संग्रहित छायाचित्र

Gudhipadwa 2023 | मुंबई – हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील विविध शहरांतून शोभायात्रा निघते. मुंबईतील गिरगावातील शोभायात्रा प्रसिद्ध आहे. आता, भायखळ्यातही गुढीपाडव्यानिमित्ताने शोभायात्रा निघणार आहे. सकाळी ९ वाजता मंदार निकेतन इमारतीच्या पटांगणापासून ही शोभायात्रा निघेल. दुपारी दोन वाजेपर्यंत ही शोभायात्रा चालेल. भायखळा स्थानक पश्चिम येथून ना. म. जोशी मार्गाने मॅनेजमेन्ट गुरू कै.गंगाराम तळेकर चौकातून कॅा. गणाचार्य चौकात (चिंचपोकळी-प) असा या शोभायात्रेचा मार्गक्रम असणार आहे. येथून पुन्हा ती आल्या मार्गाने परत भायखळा स्थानक पश्चिम येथे परतेल. शोभायात्रा पाहण्यासाठी गिरणगावातील लोक मोठ्या संख्येने येतात.

‘गुढीपाडवा’ (Gudi Padwa) हा मराठी लोकांसाठी नवीन वर्षाचा शुभारंभ आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. यंदा गुढीपाडवा २२ मार्च रोजी साजरा होणार आहे. गुढीपाडव्याच्या आधी अनेक दिवस नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होते. घराची साफसफाई केली जाते, घर तोरण आणि रांगोळ्यांनी सजवले जाते. या दिवशी गुढीला खास पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो. गुढीपाडव्याला संपूर्ण राज्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन घडते.

तसेच दर्शन भायखळ्याच्या गुढीपाडवा शोभायात्रेत होणार आहे. या वर्षी शोभायात्रेत “आई एकवीरा” पालखी सोहळा आयोजित केला आहे. या शोभायात्रेत पुरूष आणि महिला वर्ग मराठमोळी पारंपरिक वेशभूषा करतात. नऊवारी साड्या नेसून, फेटे बांधून, नथ घालून सहभागी होणाऱ्या तरुणांच्या जल्लोषात हिंदू नववर्षाला सुरुवात होते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे शोभायात्रा खंडीत झाली होती. मात्र आता या वर्षी भायखळ्यात ना.म. जोशी मार्गावर पुन्हा शोभायात्रेची धूम पहायला मिळणार आहे. मंदार निकेतन उत्सव मंडळ सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवते. या जाणीवेतूनच दरवर्षी मंडळ रक्तदान शिबिर आयोजित करते. या वर्षीसुध्दा मंडळाने रक्तदान शिबिराचे १९ रविवार रोजी सकाळी १० वाजता इमारतीच्या पटांगणात आयोजन केले केले आहे. मंडळांचे कार्यकर्ते व भायखळ्यामधील जनता शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करते.