Coronavirus: भाईंदरमध्ये क्वारंटाईन रुग्ण दोन तास भटकला

शिवसेना नगरसेविकेच्या माहितीनंतर पोलिसांनी केली अटक

home quarantine
beds facility

भाईंदर पूर्व येथील काशी नगर परिसरात राहणारा मात्र परदेशातून आल्यामुळे सक्तीचे होम क्वारंटाईन केलेला एक रुग्ण काल रात्री तीन तास भाईंदर पूर्व परिसरातील रस्त्यावर निर्धास्त भटकला. सदर माहिती शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविकेला समजताच त्यांनी याची माहिती तत्काळ पालिका आणि पोलिसांना दिली. यानंतर त्याला पोलिसांनी अटक करून विलागिकरण कक्षात भरती केले आहे.


हेही वाचा – रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही – अजित पवार


भाईंदर पूर्व येथील काशी नगर येथे राहणार एक युवक नुकताच परदेशातून आला होता. त्याला होम क्वारंटाईन करून तसा शिक्का त्याच्या हातावर मारला होता. मात्र, या अतिशहाण्या इसमाने आपल्या हातावरील शिक्का मिटवून काल रात्री ९ ते ११ भाईंदर पूर्व परिसरात फिरला. या कालावधीत त्याने दूध आणि किराणा सामान, भाजीपाला आदि साहित्य घेतले. ही घटना समजताच शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका तारा घरत यांनी ही माहिती पालिका आणि पोलिसांना आज सकाळी सांगितली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून भाईंदर पूर्व गोल्डन नेस्ट येथील विलागिकरण कक्षात दाखल केले आहे. पोलिस आता त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहेत.

स्थानिक नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर यांना सुध्दा वरील घटनेची माहीती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी पालिकेला आणि पोलिसांनी माहिती दिली होती. आज त्यांनी पालिका प्रशासनाला सांगून सकाळ पासून ते दुपार पर्यंत या परिसरात स्वतः उभे राहून औषध फवारणी करून घेतली.