घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023मुंबईतील ग्राऊंडचा प्रश्न... मंत्र्यांविरोधात भाजपाचे आमदार मैदानात, विरोधकांची फिल्डिंग

मुंबईतील ग्राऊंडचा प्रश्न… मंत्र्यांविरोधात भाजपाचे आमदार मैदानात, विरोधकांची फिल्डिंग

Subscribe

Mumbai Grounds | भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी हा प्रश्न उपस्थित करून याबाबत आलेल्या लेखी उत्तरावरच त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे विरोधकांनीही या प्रश्नी हस्तक्षेप करून सरकारला धारेवर धरले.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) हद्दीत येणाऱ्या मैदानांची दूरवस्था झालेली आहे. या मैदानांमध्ये (Mumbai Grounds) सोयी-सुविधांचा अभाव असल्याने येथे येत असणाऱ्या अबालवृद्धांना त्रास सहन करावा लागतो. यावरून आज विधानसभेत सत्ताधाऱ्यांमध्ये आपपासताच जुंपली. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी हा प्रश्न उपस्थित करून याबाबत आलेल्या लेखी उत्तरावरच त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे विरोधकांनीही या प्रश्नी हस्तक्षेप करून सरकारला धारेवर धरले.

हेही वाचा – मुंबईकरांसाठी खुशखबर; उद्याने आणि मैदाने रात्री १० पर्यंत राहणार खुली

- Advertisement -

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच उद्यानांमध्ये पुरेशी स्वच्छतागृहे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांची विशेषकरून अबालवृद्धांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, याबाबत आशिष शेलारांनी मुद्दा उपस्थित केला. यावर हे खरे नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले होते. यावरून आशिष शेलारांनी हे उत्तर चुकीचे असल्याचे सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या कोणत्याच मैदानांवर स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याकडे आशिष शेलारांनी लक्ष वेधले. त्यामुळे या सुविधा लवकरात लवकर पुरवाव्यात आणि लेखी उत्तरात बदल करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की, मुंबईत ४३७ खुल्या जागा आहेत. यापैकी काही उद्याने आहेत, काही मनोरंजन उद्याने आहेत आणि काही खेळाची मैदाने आहेत. त्यामुळे ही उद्यानेही बंधनकारक करावी अशी मागणीही आशिष शेलारांनी केली.

मैदानाचा हाच मुद्दा आमदार अजय चौधरी यांनीही मांडला. परळ येथील नरेपार्क उद्यान, भोगले उद्यान आणि काळाचौकीतील उद्यानाची दूरवस्था झाल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. तसंच, आमदार भारती लव्हेकरसह विरोधीपक्षनेते अजित पवार, नाना पटोले यांनीही मुंबईतील मैदानांच्या अवस्थेबद्दल सभागृहात मुद्दा छेडला. याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याचे मंत्री या नात्याने उत्तर देणं अपेक्षित असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून उत्तरे देण्यात येत होती. यावरून नाना पटोले यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रश्न उत्तर देण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

मुंबईतील सर्वच मैदानात सोयी सुविधा नसल्याचे खरे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले. मात्र, असे करताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र डागलं. गेल्या १५-२० वर्षात झालं नाही म्हणून आम्ही कामं करतोय. आमची कामे दृष्यस्वरुपातही दिसत आहेत. अनेक वर्षे खड्ड्यातून तुम्ही प्रवास केला. पण खड्डेमुक्त मुंबई करण्याचं आम्ही ठरवलं आहे, असा टोला शिंदेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भरसभागृहात लगावला. तर, उद्यानांमध्ये स्वच्छतागृह, प्रकाशयोजना, पाणी आदी सर्व सुविधा देण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्वच मैदानांच्या सुशोभिकरणासाठी डीपीआर तयार करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत. उद्यानात स्वच्छतागृह, प्रकाशयोजना, पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षा पुरवण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच, मुंबई महापालिकेच्या हद्दीतील इस्टर्न आणि वेस्टर्न महामार्गावरही १०-१० चांगल्या दर्जाची अद्ययावत स्वच्छतागृह बांधण्याच्याही सूचना देण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसंच, मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच राज्यातील सर्वच महापालिकेतील मैदानांसाठी अशा सूचना देण्यात येतील, असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी आमदार अमित देशमुख यांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -