लोकांचे विद्यापीठ असले पाहिजे आणि विद्यापीठाची भाषा लोकाभिमुख असली पाहिजे, असे विचार आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे आहेत. हे विचार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून महाराष्ट्रासह देश व परदेशातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनुसार मुक्त विद्यापीठाची घोडदौड सुरु आहे. मुक्त विद्यापीठातर्फे सुरु केलेला परसबाग प्रमाणपत्र अभ्यासक्रम भाषा अनुवाद केंद्रातर्फे हिंदीमध्ये तयार करण्यात आला असून, हा अभ्यासक्रम स्विकारण्याची सहमती उत्तराखंड, उत्तप्रदेश आणि मध्यप्रदेश मुक्त विद्यापीठाने दर्शविली आहे. मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम परराज्याच्या भाषेत शिकवला जाणार आहे, ही बाब अभिमानास्पद आहे, असे मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दै.‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केले. (The race for an open university began with the idea of Yashwantrao Chavan)
यशवंतराव चव्हाण आणि मुक्त विद्यापीठाबद्दल काय सांगाल?
– ‘ज्ञानगंगा घरोघरी’चे ब्रीद घेऊन सातत्याने नवनवे उपक्रम राबवणार्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची वाटचाल यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानुसार सुरु आहे. चव्हाण यांचे विचार शिक्षण, औद्योगिक, राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रांशी निगडीत आहेत. विद्यापीठ लोकाभिमुख असले पाहिजे. लोकांसाठी विद्यापीठ असले पाहिजे, असे विचार यशवंतराव चव्हाण यांचे आहेत. आजही मुक्त विद्यापीठ चव्हाण यांच्या विचारांनुसार विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रम सुरु केले आहेत. रोजगाराभिमुख विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण दिले जात आहे. मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचा समर्थ पर्याय उपलब्ध करून दिला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना माफक शुल्कात शिक्षण उपलब्ध केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळत आहे. या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय व नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबाबत काय सांगाल?
– यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची आयबीएम कंपनीसोबत पहिली बैठक नुकतीच झाली. या कंपनीसोबत डाटा विश्लेषण अभ्यासक्रमाबाबत सुरु केला जाणार आहे. जुलै २०२५ पासून एआय फॉर सोशल सायन्स, एआय फॉर कॉमर्स आणि एआय फॉार लॅग्वेज हे अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत. एआयच्या माध्यमातून सुरु केले जाणारे नॉन सायन्स अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून, त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्य मिळणार आहे.
परसबाग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाबाबत काय सांगाल?
– यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या भाषा अनुवाद केंद्रातर्फे परसबाग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे हिंदीमध्ये तब्बल १३ पुस्तके तयार करण्यात आली आहेत. हा अभ्यासक्रम हिंदीमध्ये असल्याने उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश मुक्त विद्यापीठाने स्विकारण्याची सहमती दर्शवली आहे. ही बाब यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या लौकिकात भर टाकणारी आहे.
सायबर गुन्हे विश्लेषण अभ्यासक्रमाबद्दल काय सांगाल?
– मुक्त विद्यापीठाच्या साडेतीन दशकाच्या वाटचालीत आज बरेच असे विद्यार्थी आहे, ज्यांनी मुक्त विद्यापीठाचे शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत उच्चपदावर कार्यरत आहेत. तसेच विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी कृषी आणि इतर क्षेत्रात देखील यशस्वी व्यावसायिक झाले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुक्त विद्यापीठात व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकास प्रशाला सुरु करण्यात आली आहे. आधुनिक काळात माहिती प्रणालीचे रक्षण करण्याची आणि सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक कौशल्ये असावी, या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सायबर गुन्हे विश्लेषण हा नवीन पदविका अभ्यासक्रम ७ मार्च २०२५ पासून सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे, या अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील ६० पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी प्रवेश घेतला आहे.
विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या घनशेत गावाबद्दल काय सांगाल?
– यशवंतराव चव्हाण यांच्या विकास संकल्पनेनुसार शास्त्रशुद्ध कृषी शिक्षण देवून व शेतीस पूरक उद्योग सुरु होऊन गावाचा विकास झाला पाहिजे. त्याअंतर्गत व सामाजिक मुक्त बांधिलकी म्हणून घनशेत गावाचा विकास करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. या गावात विद्यापीठातर्फे स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थांसाठी यशवंत वाचनालय करिअर अकादमी सुरु केली आहे. या वाचनालयाच्या १४ विद्यार्थ्यांची सहाय्यक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, शिक्षक, वनरक्षक अशा विविध पदांवर निवड झाली आहे.