घरमहाराष्ट्रसत्तासंघर्षाचा निकाल आठवडाभरात? राजकारणात आणखी एक नाट्यमय वळणाची शक्यता

सत्तासंघर्षाचा निकाल आठवडाभरात? राजकारणात आणखी एक नाट्यमय वळणाची शक्यता

Subscribe

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra political crisis) सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पूर्ण झाली आहे. त्याचा निकाल राखून ठेवण्यात आला असून त्याला आता जवळपास दोन महिने होत आले आहेत. पण आता घटनापीठातील एक न्यायाधीश 15 मे 2023 रोजी निवृत्त होत असल्याने येत्या आठवड्याभरात हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, राज्यातील राजकारण आणखी एक नाट्यमय वळण घेण्याची चिन्हे आहेत.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud ), न्या. एम. आर. शाह, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर युक्तिवाद झाला. 16 मार्च 2023 रोजी यावरील निकाल राखून ठेवत असल्याचे घटनापीठाने जाहीर केले. ठाकरे आणि शिंदे गटाने आपली बाजू मांडली तर, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडूनही युक्तिवाद करण्यात आला. त्यातच एप्रिल महिन्याच्या अखेरिस सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठातील एका न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाल्याने सरन्यायाधीशच क्वारंटाइन झाले होते.

- Advertisement -

येत्या 15 मे रोजी न्या. एम. आर. शाह हे निवृत्त होत आहेत. त्यामुळे हा निकाल 15 मेच्या आत येणे अपेक्षित आहे. 13 तारखेला दुसरी शनिवार आणि 14 तारखेला रविवार असल्याने या दोन दिवशी निकाल जाहीर होणार नाही. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार किंवा प्रत्यक्ष 15 मे रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे निकालाच्या बाबतीत धाकधुक वाढलेली असतानाच, विविध राजकीय नेत्यांकडून होणारी वक्तव्ये तसेच राजकीय घडामोडींमुळे विविध तर्क व्यक्त करण्यात येत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) हे सध्या निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकमध्ये आहेत. गेल्या शुक्रवारी (5 मे 2023) त्यांनी कोल्हापूरच्या चंदगड येथे ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले होते. ‘मी पुन्हा येणार आहे. जेव्हा मी सांगतो की मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतोच, हे तुम्हाला माहीत आहे. कसा येतो, हे देखील तुम्हाला ठाऊक आहे. आपले कुलदैवत नरसिंह आहे आणि आपण कुठूनही प्रकट होतो,’ अशी पुस्ती त्यांनी जोडली होती.

- Advertisement -

फडणवीसांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज, रविवारी टिप्पणी केली. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येईल, हे सांगता येणार नाही. तथापि, देवेंद्र फडणवीस जर पुन्हा येईन म्हणत असतील तर त्यांना कदाचित निकालाबाबत माहिती असेल, असा टोला त्यांनी लगावला.

याच पार्श्वभूमीवर गेले आठवडाभर हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता. 2 मे रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आणि नंतर पुढचे चार दिवस बड्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत त्यांची मनधरणी करण्यात आली. अखेर शुक्रवारी त्यांनी आपणच अध्यक्षपदी राहणार असल्याचे जाहीर केले. पक्षाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात असतानाच पवारांनी हे राजीनामा नाट्य घडवून काही काळासाठी राजकारणाची दिशा बदलली. शिवाय, पक्षावरील आपली पकड मजबूत केली.

या सत्तासंघर्षाच्या निकालावर ज्यांचे भवितव्य अवलंबून आहे त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व त्यांच्या समर्थक आमदारांची वास्तवात धाकधुक वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाबाबत तर्कवितर्क मांडले जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे हे स्नेहभोजनासाठी राजभवनात गेले. या डिनर डिप्लोमसीची चर्चा रंगली होती. या सर्व घडामोडी पाहता, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राजकारणातील समीकरणे पुन्हा एकदा बदलू शकतात, असा होरा राजकीय विश्लेषकांचा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -