मुंबई : गेल्या आठ महिन्यांत राज्यात दीड हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील 685 शेतकरी फक्त मराठवाड्यातील आहेत. बीड जिल्ह्यात किमान 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सव काळातले हे चित्र विदारक आहे. मोदी हे स्वातंत्र्याचा अमृतकाल त्यांच्या पद्धतीने साजरा करीत आहेत. त्यात जनतेसाठी अमृत कमी व फसव्या घोषणांचा विषाचा प्यालाच जास्त आहे. मराठवाड्याच्या बाबतीत त्यापेक्षा वेगळे काय आहे? त्याच घोषणा आणि तीच फसवणूक, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने राज्य सरकारवर केली आहे.
हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळाची आज मराठवाड्यात बैठक; 40 हजार कोटींचे पॅकेज?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मराठवाड्याचे सुपुत्र. त्यांचा मुक्काम पोस्ट संभाजीनगरातच असतो. मराठवाड्यातील मागच्या फसवणुकीवर त्यांनी सरकारला उघडे पाडले आहे. ‘‘यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2016मध्ये संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन साधारण 50 हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांचे काय झाले?’’ असा प्रश्न दानवे यांनी विचारला आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
फडणवीसांच्या घोषणा व त्या घोषणांवर उडवलेले आकडे नमुनेदार आहेत. मराठवाड्यात डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून एक हजार गावांत दूध योजना राबवून सवा लाख लोकांना रोजगार देण्याची घोषणा फडणवीसांनी केली होती. त्या दूध प्रकल्पाचे काय झाले? त्या दुधाचे लोणी कोणाच्या तोंडी लागले की खोके सरकार आणण्यात खर्च झाले? असा बोचरा सवाल ठाकरे गटाने केला आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कारणामुळे फाइव्ह स्टार हॉटेलमधील मुक्काम शासकीय विश्रामगृहात हलवला
संभाजीनगरातील करोडीला ट्रान्सपोर्ट हब बनवून तेथेही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची घोषणा हवेत विरली. लातूरच्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम कुठे बारगळले? परभणी येथे 68 एकरावर टेक्स्टाईल पार्क उभारण्याच्या घोषणेचे काय झाले? नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरच्या विकासासाठी घोषित केलेल्या 250 कोटी रुपयांच्या निधीचे काय झाले? म्हणजे जनतेची तर सोडाच, देव-देवतांची फसवणूक करायलाही हे सरकार मागेपुढे पाहत नाही, अशी कठोर टीकाही या अग्रलेखात करण्यात आली आहे.
कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेसाठी 4800 कोटी आणि नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी 2826 कोटींचा निधी देण्याच्या वल्गना फडणवीसांनी केल्या होत्या. या तमाम घोषणांचे काय झाले, हे आधी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी सरकारने जाहीर करायला हवे. त्यानंतरच नवीन घोषणांची गाजरे मराठवाडी जनतेला दाखवायला हवीत. 2016मध्ये केलेल्या एकाही घोषणेची अंमलबजावणी नाही व आता हे 2023 साठी नवे पॅकेज घेऊन येत आहेत. नांदेड, लातूर, धाराशीव, म्हैसमाळ अशा ठिकाणी अनेक योजना उभारण्याचे जाहीर केले गेले, मात्र त्याची एकही वीट गेल्या पाच वर्षांत रचली नाही. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीत तरी वेगळे काय होईल? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.