सिन्नरच्या वडांगळीकरांचा जावई शोध सुरू; गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा

नाशिक : सिन्नर तालुक्यातील वडांगळी गाव विविध प्रथा परंपरा, नाटके, यात्रोत्सव, बोकडबळी यासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. गाढवावरुन जावयाची धिंड काढण्याची वडांगळीकरांची परंपरादेखील तितकीच चर्चेची ठरते. दरवर्षाप्रमाणे यंदाही हा जावई शोध सुरूच आहे.

होळी ते रंगपंचमीदरम्यान वडांगळी तसेच पंचक्रोशीतील एखादा पाहुणा किंवा जावई शोधून त्याची मनधरणी करून त्याची धिंड काढली जाते. त्यासाठी त्याला धिंडीचे महत्व समजावून सांगत त्याची मनधरणी करतात. गाढवावरून धिंड काढणे म्हणजे प्रतिष्ठेचे नव्हे निषेध, तिरस्काराचे प्रतीक मानले जाते. परंतु, येथे गाढवावरून धिंड काढणे प्रतिष्ठेचे व सन्मानाचे मानले जाते. ही प्रथा स्वतः ब्रिटिशांनी बंद करण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु, गावकर्‍यांनी त्याला कडवा प्रतिकार करत परंपरा जिवंत ठेवली, असे जाणकार सांगतात. विशेष म्हणजे या धिंडीसाठी शिक्षक, व्यावसायिक, नोकर, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एव्हढेच नव्हेतर डॉक्टरांनीही पुढाकार घेतला आहे.

पूर्वीच्या काळात जावई अगर कोणता पाहुणा फिरकत नसे. कारण, त्याला बळजबरीने गाढवावर बसवले जाई. गाव करील ते राव काय करील, या म्हणीप्रमाणे एकदाचे होऊन जाऊ द्या या भावनेने जावईदेखील तयार होत. गाढवावर बसलेल्या जावयाचा विशेष पेहराव म्हणजे डोक्याला सुपाचे फाटलेले बाशिंग, कपाळावर मुंडावळ्या, अंगात फाटका शर्ट, गळ्यात कांदा-बटाटे-लसणाच्या माळा, तोंडाला काळे फासून वेगवेगळ्या रंगाने मेकअप करून मिरवणुकीसाठी जय्यत तयारी केली जाते. वडांगळीच्या मुख्य बाजारपेठेत शनी चौकात चिंचेच्या झाडाखाली सुसज्ज गाढवावर विराजमान होऊन जावयाच्या शाही मिरवणुकीचा श्रीगणेशा केला जातो. ढोलताशाच्या गजरात, रंग व गुलालाची उधळण करत चिखलपाणी उडवत तरुणाई बेधुंद नाचत थाटामाटाने निघालेल्या धिंडीचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. दुतर्फा आबाल वृद्धांची मोठी गर्दी, लहान पोरांचा गलका, ढोलताशाच्या गजरात मिरवणूक यजमानाच्या दारात येते व तेथे सांगता होते.