एनडीएतील भाजपच्या मित्र पक्षांंच्याही जागा कमी होणार

५४ जागांवरून ४० ते ४२ जागांवर घसरणार

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटून २१० ते २२५ होण्याची शक्यता आहे. यावेळी देशात २०१४ प्रमाणे मोदी लाट नाही. अनेक राज्यांमध्ये भाजपला अ‍ॅण्टी एन्कंबन्सी फॅक्टर भोवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या एनडीएतील मित्र पक्षांची कामगिरीही फार काही चांगली होण्याची शक्यता नाही. तेलगू देसम, राष्ट्रीय लोकसमता पार्टी, स्वाभिमानी पक्ष यांसारखे मित्र पक्ष एनडीएतून बाहेर पडले आहेत. अण्णाद्रमुक, जनता दल (संयुक्त) यांच्यासारखे पक्ष एनडीएत आले आहेत.

 या सर्वांना मिळणार्‍या जागांची गोळा बेरीज केली तर एनडीएच्या घटक पक्षांना ४० ते ४२ जागा मिळू शकतात. त्या २०१४ सालच्या एकूण ५४ जागांपेक्षा १२ ते १४ जागांनी कमी होणार आहेत. म्हणजे एनडीएच्या मित्र पक्षांना किमान १२ जागांचा फटका बसू शकतो. २०१४ साली एनडीएत २२ स्थानिक पक्ष सहभागी होते. या पक्षांनी आपल्या राज्यांमध्ये भाजपशी युती करून लोकसभा निवडणुका लढवल्या मात्र केवळ १२ पक्षांनाच लोकसभेत यश मिळाले होते. ज्या पक्षांना २०१४ साली लोकसभेत जागा मिळाल्या ते पक्ष बाजूच्या चौकटीत.

 

एनडीएतील घटक पक्षांनी २०१४ सालच्या निवडणुकीत एकूण ५४ जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी असलेल्या मोदी लाटेचा फायदा एनडीएतील भाजपच्या सर्वच घटक पक्षांनाही झाला होता. त्यामुळे त्यांना या वाढीव जागा मिळू शकल्या. महाराष्ट्रातही मोदी लाटेच्या जोरावर शिवसनेला १८ जागा जिंकता आल्या. मात्र, २०१९ लोकसभेची स्थिती तशी नाही. मुख्य म्हणजे यावेळी मोदी लाट नाही. दुसरे म्हणजे उपेंद्र कुशवाह यांची राष्ट्रीय लोकसमता पार्टी आणि चंद्राबाबू नायडू यांची तेलगू देसम पार्टी यावेळी भाजपच्यासोबत एनडीएत नाही. त्याचा फटका एनडीएला यावेळी बसू शकतो. २०१४ साली शिवसेनेला महाराष्ट्रात १८ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेची ही कामगिरी पुन्हा तशीच होण्याची सुतराम शक्यता नाही. यावेळी शिवसेनेला १० ते १२ जागा मिळू शकतात. यावेळी चंद्राबाबू यांचा तेलगू देसम पक्षही एनडीएतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्यांच्या १६ जागांचा फटका एनडीएला अगोदरच बसला आहे.

शिरोमणी अकाली दलाला २०१४ सालच्या निवडणुकीत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. पंजाबमधील जनतेचा कौल यावेळी अकाली दलाला मिळेल असे मानले तरी त्यांच्या जागा फार फार तर अजून ३ ने वाढतील. लोक जनशक्ती पार्टी बिहारमध्ये यावेळी तितकीशी चांगली कामगिरी करेलच असे दिसत नाही. त्यांच्या जागा दोन-तीनने घटू शकतात. स्वाभिमानी पक्ष आता भाजपसोबत नाही. नागा पिपल्स फ्रन्टही एनडीएसोबत नाही. याचा विचार केला तर सुमारे ३०-३२ जागांचा फटका एनडीएतील घटक पक्षांना बसू शकतो. त्यामुळे एनडीतील घटक पक्षांच्या जागा ५४ वरून थेट ४२ ते ४४ वर येऊ शकतात.

२०१९ मध्ये एनडीएत
अण्णा द्रमुक, जनता दल (से.)

२०१९ साली एनडीएतील भाजपचे नवे मित्र
पक्ष आणि त्यांना मिळू शकणार्‍या जागा
अण्णा द्रमुक (तामिळनाडू) – ८
जनता दल (संयुक्त) (बिहार) – १०

दुसर्‍या बाजूला विचार केला तर जयललिता यांचा अण्णा द्रमुक आणि नितीशकुमार यांचा जनता दल (संयुक्त) हे पक्ष २०१९मध्ये भाजपसोबत आले आहेत. अण्णाद्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा जयललिता आता राहिलेल्या नाहीत. तसेच अण्णाद्रमुक पक्षात दुफळी माजली आहे. तामिळनाडूतील जनता ५ वर्षांनंतर कायम एकाच पक्षाच्या मागे कायम राहत नाही हा इतिहास आहे. याचा विचार केला तर अण्णाद्रमुक पक्षाला २०१४ साली तामिळनाडूत ४० पैकी ३७ जागा होत्या. यावेळी केवळ ७-८ खासदार निवडून येण्याची चिन्हे आहेत. नितीशकुमार यांची बिहारमध्ये भाजपशी युती आहे. त्यांचे १० ते १२ खासदार निवडून येऊ शकतात. त्यामुळे एनडीए वाढणार्‍या जागा १८ आहेत. त्यामुळे यावेळी एनडीएतील घटक पक्षांना एकूण २४ अधिक १८ म्हणजे ४२ जागा मिळू शकतात. तरीही एनडीएतील घटक पक्षांना किमान १२ जागांचा फटका बसू शकतो.

युतीला १० ते १२ जागांचा फटका
महाराष्ट्रात २०१४ साली भाजप आणि शिवसेनेने नेत्रदिपक कामगिरी केली होती. भाजप-शिवसेना युतीला ४१ तर राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला १ जागा मिळून ४२ जागा झाल्या होत्या. मात्र त्याची पुनरावृत्ती यावेळच्या लोकसभा निवडणुकीत होणे कठिण आहे. यावेळी राज्यात भाजप आणि शिवसेनेला तब्बल १० ते १२ जागांचा फटका बसू शकतो. ४२ संख्येवरून युतीच्या जागा २८ ते ३० पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. नुकतेच विदर्भात पहिल्या टप्प्यातील मतदान ७ जागांसाठी पार पडले. या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत भाजप-सेनेला सात पैकी ४ जागा मिळू शकतील. युतीचे २ जागांचे नुकसान होऊ शकते.

दुसरा टप्पा मराठवाड्यातील असून १० लोकसभा मतदार केंद्रात येत्या १८ तारखेला निवडणुका आहेत. युतीला या १० पैकी ४ जागांचा मराठवाड्यात फटका बसण्याची शक्यता आहे. तिसर्‍या टप्प्यातील मतदान २३ एप्रिलला १५ जागांसाठी होत आहे.

यापैकी किमान ५ जागा कमी होतील. चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला १३ जागांवर मतदान होणार आहे. मुंबईतील सहा, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जागांचा समावेश आहे. मुंबईतील सहा जागांपैकी युतीच्या २जागा धोक्यात आहेत. या सर्व जागांचा विचार केला तर युतीला किमान १२ जागांचा फटका महाराष्ट्रात बसू शकतो. तर दुसरीकडे काँग्रेस २,राष्ट्रवादी ४ असे ६ खासदार असलेली आघाडी १६ पर्यंत मजल मारू शकते.