सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या वज्रलेपनाला श्रमिक सेनेचाही विरोध

पंचवटी : वणी येथील सप्तशृंगी गडावरील भगवतीच्या मूर्ती संवर्धन करण्याचा निर्णय श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला आहे. मात्र, निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शविला असून यामध्ये श्रमिक सेनेने देखील आपला विरोध नोंदविला असून याबाबतचे लेखी निवेदन ट्रस्टच्या अधिकार्‍यांना देण्यात आले.

श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने २०१२-१३ पासून श्री भगवती स्वरूप मूर्ती संवर्धन आणि देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरु होते. यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाने शासनाच्या पुरातत्व विभाग, आयआयटी, पवई यांच्यासह अजिंक्यतारा कन्सल्टन्सी यांच्या मार्फत तज्ञ मार्गदर्शन प्राप्त करून श्री भगवती स्वरूप मूर्ती संवर्धन आणि देखभाल करण्यासाठी निल कंस्ट्रक्शनला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला पहिले आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महंत ऋषिकेश नंदगिरी महाराज आणि त्रंबकेश्वर मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी आपला विरोध दर्शविला होता. त्याचप्रमाणे शिवसेना नेते सुनील बागूल यांच्या श्रमिक सेनेने देखील यामध्ये उडी घेतली असून, भगवतीची मूर्ती ही स्वयंभू आहे. निल कसन्ट्रक्शन या कंपनीने यापूर्वी कुठल्याही मूर्तीला वज्रलेपन करण्याचा अनुभव नाही. यापूर्वी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीला वज्रलेपन करीत असताना अंबाबाईच्या डोक्यावरील नागाच्या मूर्तीला इजा झाली होती. तसेच, पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मूर्तीला केलेले वज्रलेपन आपोआप गळून पडले होते. अशी कुठलीही घटना भगवतीच्या मूर्तीबाबत होऊ नये यासाठी महाराष्ट्रातील तमाम भाविकांच्या भावना, श्रद्धेचा विचार करून काळजीपूर्वक काम करण्याची विनंती केली आहे. दिलेल्या निवेदनावर श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल,शहराध्यक्ष मामा राजवाडे, जिल्हाध्यक्ष अजय बागूल, कार्याध्यक्ष भगवंत पाठक यांच्या स्वाक्षरी आहेत.

वणी गडावरील स्वयंभू सप्तशृंगी माता अखंड महाराष्ट्रासह भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ट्रस्टने घेतलेला निर्णय एकतर्फी असून आमच्या संघटनेचा त्याला विरोध आहे. मूर्तीला कुठल्याही वज्रलेपनाची गरज नसल्याबाबत स्थानिकांनी आमच्याकडे व्यथा मांडली आहे. वज्रलेपनामुळे मूळ मूर्तीला धक्का लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ट्रस्टने काम सर्व साधू-महंत, पुजारी, सामाजिक-राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा. : मामा राजवाडे, शहराध्यक्ष, श्रमिक सेना