घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगोदावरीने वळण घेतल्यानेच नाशिकला अध्यात्मिक, धार्मिक महत्व

गोदावरीने वळण घेतल्यानेच नाशिकला अध्यात्मिक, धार्मिक महत्व

Subscribe

डॉ. कैलास कमोद यांनी उलगडला इतिहसकालीन खजिना
नाशिक : गोदावरी नदी औरंगाबाद व नांदेड शहरातून जात असली तरी नाशिक शहराला गोदावरीचे विशेष महत्व आहे. पूर्व वाहिनी असलेली गोदावरी नाशिक शहरातील रामकुंड या ठिकाणी दक्षिण वाहिनी होते. या वळणास विशेष धार्मिक महत्व आहे. ब्रिटीश अधिकार्‍यांनीसुद्धा १८८३ मध्ये गॅझेटमध्ये नोंद केली आहे. त्यामुळे नाशिकला अध्यात्मिक व धार्मिक महत्व आहे, अशी माहिती देत डॉ. कैलास कमोद यांनी नाशिकचा इतिहासकालीन खजिना नाशिककरांसमोर उलगडला. त्यास नाशिककांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

निमित्त होते, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी नाशिक, राज्य पुरातत्व विभाग व नाशिक इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी नदी महोत्सवाचे. या महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि.१७) गोदाघाटावरचे नाशिक या विषयावर डॉ. कैलास कमोद यांचे व्याख्यान सरकारवाड्यात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

डॉ. कैलास कमोद म्हणाले, नाशिक शहरात गोदावरीचे पात्र २०० मीटरचे आहे. गोदावरीचा गाळा वाहून जमा झालेल्या टेकड्यांवरचे ठिकाण हे मूळ नाशिक आहे. त्यामध्ये बुधवार पेठ, म्हसरुळ टेक, चित्रघंटा हे मूळ नाशिक आहे. या ठिकाणी हिंदू आणि मुस्लीम लोक राहत आले आहेत. पेशव्यांच्या सरदारांनी रामकुंड परिसरात मंदिरे बांधली. मंदिरांमुळे गावठाण तयार झाले. काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, कपालेश्वर मंदिर, नीळकंठश्वर मंदिर, नारोशंकर मंदिरांमुळे नाशिकचे सौंदर्य टिकून आहे. मात्र, सुंदर नारायण मंदिराची दुरवस्था झाली आहे. २५० वर्षांपूर्वी रामकुंड बांधण्यात आला. या ठिकाणी गांधी ज्योत साकारण्यात आली. १९६९ मध्ये नव्याने यशवंत महाराज मंदिर साकारण्यात आले. तर शंभर वर्षांपूर्वी दुतोंड्या मारुतीची छत नसलेली मूर्ती साकारण्यात आली. ही मूर्ती पुढे पूररेषा म्हणून ओळखली जाऊ लागली. रामकुंडावर अस्थी विसर्जन होवू लागले. त्यामुळे नाशिकचे पर्यटन वाढू लागले. १८६५ मध्ये रेल्वे स्टेशन तयार झाले. त्यामुळे मुंबईचे पर्यटक नाशिकला येऊ लागले. १८९७ मध्ये मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला. तो मुंबई नाका, अशोकस्तंभ, व्हिक्टोरिया पूलमागे जुना आडगाव नाका येथून पुढे धुळे, आग्रा, दिल्लीकडे गेला. परिणामी, उत्तर भारतीय भाविक मोठ्या संख्येने नाशिकला येऊ लागले.

यावेळी विजय निप्पाणीकर, नाणेसंग्रहक चेतन राजापूरकर, प्रा. आनंद बोरा, रमेश पडवळ, श्रीकांत बेणी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

धार्मिकस्थळे, तीर्थक्षेत्र नाशिकची ताकद

नाशिकचा खरा विकास तीर्थक्षेत्र आणि गंगापूर धरणामुळे झाला आहे. धरणामुळे कृषी उत्पादनात वाढ झाली. शिवाय, उद्योगधंदे नाशिकला आले. त्यामुळे नाशिक समृद्ध झाले. धार्मिकस्थळे आणि तीर्थक्षेत्र ही नाशिकची ताकद आहे. नाशिकमध्ये कुंभमेळासुद्धा होतो. त्यामुळे ती ताकद भविष्यात वाढवल्यस नाशिकचा आणखी विकास होईल, असे डॉ. कैलास कमोद यांनी सांगितले.

नाशिककरांच्या सुखदु:खांची गोदावरी साक्षीदारी

नाशिककरांचे दैनंदिन जीवन गोदावरीशी निगडीत आहे. सर्व सण रामकुंडावर साजरे केले जात असायचे. कोणतेही खाद्यपदार्थ रामकुंडावर उपलब्ध असायचे. शिवाय, अस्थी विसर्जनसुद्धा गोदावरी नदीकाठी होत असल्याने गोदावरी नाशिककरांच्या सुखदुखांची साक्षीदार आहे.

या मंदिरातून दिसतो दुसर्‍या मंदिरातील दिवा

नाशिकमध्ये पहिल्यांदा १७२३ मध्ये कपालेश्वर मंदिर उंचावर साकारण्यात आले. त्यानंतर २५ वर्षांनी गोदावरीच्या नदीपात्रात सुंदर नारायण मंदिर साकारण्यात आले. १८५७ मध्ये राणी व्हिक्टोरिया पूल म्हणजे अहिल्यादेवी पुलामुळे सुंदर नारायण मंदिराच्या पायर्‍या झाकल्या गेल्या. सुंदर नारायण मंदिर हे स्थापत्य कलेचा चमत्कार आहे. सुंदर नारायण मंदिरातील मूर्तीवर दक्षिणायन आणि उत्तरायनातील पहिली सूर्यकिरणे पडतात. कपालेश्वर आणि सुंदर नारायण मंदिरे १८० अंशामध्ये साकारण्यात आली आहेत. या दोन्ही मंदिरांच्या गाभार्‍यात लावलेले दिवे भाविकांना कोणत्याही एका मंदिरातून पाहता येतात. त्यामुळे दिवाळीत नाशिककर दिवे बघण्यासाठी गर्दी करतात, असे डॉ. कैलास कमोद यांनी सांगितले.

गोदावरी , गिरणा नदीच्या संस्कृती, भाषेत फरक

नद्यांचा जनमाणसावर व्यापक परिणाम झाला आहे. गोदावरी आणि उपनद्यांमुळे नाशिक जिल्हा समृद्ध झाला आहे. गोदावरी आणि गिरणा नदीची संस्कृती वेगवेगळी आहे. गिरणा नदीकाठच्या कळवण, बागलाण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील खाद्यसंस्कृती व भाषेत फरक आहे. या ठिकाणी मांडा हा खाद्यपदार्थ नागरिक आवडीने खातात. तर गिरणाकाठच्या नागरिकांचे शब्दोच्चार वेगळे आहेत. शिवाय, नागरिक ऐरणी भाषासुद्धा बोलतात, असे डॉ. कमोद यांनी सांगितले.

भाविकांच्या मनातील अन् प्रत्यक्षातील गंगा नदी वेगळी

भारतात सर्वात मोठी गंगा नदी असून, गंगेचे पात्र २ हजार २२५ किलोमीटर आहे. निर्माल्यासह कारखान्यांचे पाणी मिसळत असल्याने पवित्र गंगा नदीचे हाल न पाहवणारे आहेत. भाविकांच्या मनातील गंगा नदी आणि प्रत्यक्षातील गंगा नदी वेगळी आहे, असे डॉ. कमोद यांनी सांगितले.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -